मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र शाळांच्या फीबाबत दिलासा देण्याची मागणी करणारं आहे. अमित ठाकरे यांच्या फेसबुक पेजवर हे पत्र पोस्ट करण्यात आलं आहे.

काय मागणी केली आहे अमित ठाकरेंनी?
करोना संकटकाळाच्या पार्श्वभूमीवर फी भरण्यासाठी पालकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला जाऊ नये या हेतून राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे तीन महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या.

१) शाळांनी पालकांना फी मासिक किंवा त्रैमासिक जमा करण्याचा पर्याय द्यावा

२) कोणत्याही प्रकारची फी वाढ करु नये

३) शक्य झाल्यास पालकांच्या कर्मचारी समितीमध्ये ठराव करुन योग्य प्रमाणात फी कमी करावी

सदर आदेश हा सर्व बोर्डाच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांसाठी लागू होणे अपेक्षित होते. तसं त्यात नमूदही होतं. पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणजेच सीबीएसई, आयीएसएसी बोर्ड या शासन निर्णयाचं उल्लंघन करत आहेत. अनेक शाळांनी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ चं उल्लंघन केलं आहे. शाळा भरमसाठ फी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकत आहेत. काही शाळा तर फी न भरल्यासा विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात येईल असा धमकीवजा इशारा देत आहेत. ज्या पालकांकडे फी भरण्यासाठी पैसे नाहीत त्यांना प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घ्या पण शाळेची फी भरा असंही सांगितलं जातं आहे. हा सगळा प्रकार संतापजनक असून पालकांवर अन्याय आहे.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे पालकांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. करोना संकाटमुळे सर्वच स्तरांमधील पालकांपुढे आर्थिक आव्हानं उभी आहेत. अशा काळात शाळांच्या व्यवस्थापनांनी समजूतदारपणे वागणं अपेक्षित होतं. मात्र ८ मे रोजी काढण्यात आलेल्या आदेशाविरोधात खासगी शाळा उच्च न्यायालयात गेल्या आहेत. त्यानंतर राज्य सरकारच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. याप्रकरणी पुढच्या सुनावणीच्या वेळी पालकांच्या बाजूने म्हणजे शाळांच्या फीवाढीविरोधात राज्य सरकारने ठाम भूमिका घेणं आवश्यक आहे.

माझी आपणास आग्रहाची विनंती आहे की, पालकांकडून शाळांनी वाढीव फी घेऊ नये. तसेच फी भरण्यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव टाकला जाऊ नये.

आपला नम्र
अमित ठाकरे

अशा प्रकारे पत्र लिहून मनसेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.