गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियासह विविध देशांमध्ये सन्मान मिळवणाऱ्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. इटलीतील फ्लोरेन्समध्ये सुरू असलेल्या ‘रिव्हर टु रिव्हर २०१२’ या भारतीय चित्रपट महोत्सवात त्यांना ‘सिटी ऑफ फिरेन्झ’चा किताब देऊन फ्लोरेन्स शहरात पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
इटली प्रांतातील टस्कनी शहराचे सौंदर्य पाहून आपण आश्चर्यचकित झालोच होतो आता या शहराक डून मिळालेल्या बहुमानामुळे भारावून गेलो आहोत, अशी प्रतिक्रिया अमिताभ यांनी व्यक्त केली आहे. फिरेन्झचे सौंदर्य आणि तिथले आदरातिथ्य सगळेच भारावून टाकणारे होते. ‘रिव्हर टु रिव्हर १२’ भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ तेथील सगळ्यात जुन्या ओडेन सिनेमागृहात करण्यात आला. फिरेन्झचे उपमहापौर तिथे उपस्थित होते. त्यांनी माझा सन्मान केला आणि मला पर्यटक म्हणून नव्हे तर खास पाहुणा म्हणून शहरात येण्याचे अगत्यशील आमंत्रण दिले. इटलीतील भारताचे राजदूत आणि अन्य पाहुण्यांसमोर हा बहुमान घेताना फार आनंदून गेलो, असे अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे.
सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अमिताभ यांचे ‘दीवार’, ‘ब्लॅक’ आणि ‘शोले’ हे तीन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. अमिताभ यांच्या चित्रपट कारकिर्दीचा आणि आयुष्याचा वेध घेणारा राम माधवानी दिग्दर्शित ‘एव्हरलास्टिंग लाईट’ हा लघुपटही या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. गेल्याच आठवडय़ात झालेल्या मराक्केश चित्रपट महोत्सवातही अमिताभ यांनी आपला ठसा उमटवला होता. आता इटलीवासियांचे आदरातिथ्य अमिताभ यांना अनुभवता येणार आहे.