ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून रात्री उशिरा डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांना त्रास होऊ लागल्यामुळे मंगळवारी रात्री २ वाजता त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारपासूनच त्यांच्यावर उपचार सुरू होते, आता शुक्रवारी रात्री उशिरा त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

गेस्ट्रोन्ट्रोलॉजिस्ट डॉ. बारवे यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर उपचार केले. १९८२ मध्ये ‘कुली’ चित्रपटादरम्यान अमिताभ बच्चन यांना पुनित इस्सार सोबत फाईट सीन करताना एक ठोसा पोटात बसला होता. या ठोशामुळे त्यांच्या यकृताला कायमची दुखापत झाली. आपलं यकृत केवळ २५ टक्केच कार्यरत आहे असं त्यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. त्यांना जेव्हा दुखापत झाली होती त्यावेळी ‘हेपेटाइटिस बी’ने ग्रस्त असलेल्या रूग्णाचं रक्त त्यांना देण्यात आलं होतं, ज्यामुळे त्यांना यकृताचा त्रास सुरु झाला. आता नानावटी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्यासोबत जया बच्चन आणि अभिषेक बच्चनही होते.