आरेमधील मेट्रो कारशेडसाठी सात जागांचा पर्याय दिलेला असतानादेखील, आरेतील दोन हजारांहून अधिक झाडे तोडण्याचा पर्याय मंजूर झाल्याने मुंबईकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यातच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मेट्रोसंदर्भात केलेलं ट्विट त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. मेट्रोला पाठिंबा दर्शवणारे ट्विट केल्यानंतर बिग बींच्या ‘जलसा’ या निवासस्थानाबाहेर लोकांनी आंदोलन केलं आहे. बंगल्याबाहेर निदर्शने करत ‘आरे वाचवा’च्या घोषणा दिल्या गेल्या.

‘वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत माझ्या एका मित्राने त्याच्या कारऐवजी मेट्रोचा पर्याय स्वीकारला. वेगवान, सोयीस्कर आणि कार्यक्षम मेट्रोने ते प्रभावित झाले. प्रदूषणासाठी उपाय.. अधिकाधिक झाडे लावा, मी माझ्या बागेत वृक्षारोपण केले आहे, तुम्ही केले का?,’ असं ट्विट बिग बींनी केलं. या ट्विटचा निषेध करत मुंबईकर त्यांच्या बंगल्याबाहेर पोहोचले. ‘जे काम जंगल करतं, ते बगीचे करू शकत नाही,’ असा संदेश लिहिलेले फलक हातात घेऊन बिग बींच्या ट्विटचा निषेध केला गेला.

हे आंदोलन केवळ आरेमधील नागरिकांसाठी नसून आरेविरोधात निर्णय घेणाऱ्या प्रशासकीय अधिकारी, राजकारणी यांच्या पुढच्या पिढ्यांसाठीही आहे, असे भावनिक आवाहन आंदोलकांनी केले. मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीतील २ हजार १८५ झाडे कापणे आणि ४६१ झाडांचे पुनर्रोपण करण्याबाबतचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीत २९ ऑगस्ट २०१९ रोजी मंजूर झाला.