बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांना करोनाची लागण झाली आहे. दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करत आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली. यासोबत त्यांनी गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना करोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली असल्याचं अमिताभ यांनी सांगितलं आहे.

दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या एका डॉक्टरने इंडिया टुडेशी बोलताना अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत होता असं त्यांनी सांगितलं आहे. करोना चाचणी केली असता शनिवारी संध्याकाळी त्यांचा रिपोर्ट आला. यावेळी त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं. अमिताभ बच्चन यांनी स्वत: आपल्या चाहत्यांना यासंबंधी माहिती देण्याचा निर्णय घेतल्याने रुग्णालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. अमिताभ बच्चन यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवणार नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

डॉक्टरांना अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीसंबंधी काही चिंता करण्यासारखं आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, त्यांचं वय आणि आधी झालेली जखम यावर ते अवलंबून आहे. अमिताभ बच्चन १९८२ साली ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर जखमी झाले होते. पण त्यातून बरे  झाल्यानंतर ते अतिशय शिस्तबद्धपणे जगत असून इतक्या वर्षांमध्ये कोणताही त्रास जाणवलेला नाही. डॉक्टरांनी अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल असंही सांगितलं आहे.