महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील गावात छापा टाकून मोठय़ा प्रमाणात हस्तगत करण्यात आलेला शस्त्रसाठा हा नक्षलवादी कारवायांसाठी असल्याचा संशय राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने व्यक्त केला आहे. या साठय़ामुळे शक्तिशाली बॉम्बस्फोट घडविता येऊ शकतो, तसेच बॉम्बस्फोट घडविण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हिमांशू रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर शस्रसाठा येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शहानिशा केली असता छिंदवाडा परिसरात हा साठा असून तो भाग मध्य प्रदेशमध्ये येत असल्यामुळे तेथील पोलिसांची मदत घेऊन राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या नागपूर युनिटने कारवाई करून स्फोटकांच्या ६१२ कांडय़ा, ८४० फूट लांब डिटोनेटर कॉर्ड, स्फोटक घडविणारी यंत्रणा आदी सामग्री जप्त केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी घरमालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या साठय़ाचा वापर करून शक्तिशाली बॉम्बस्फोट घडविले जाऊ शकतात, असा दावाही एका अधिकाऱ्याने केला. गडचिरोली परिसरात राज्य पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. त्या पाश्र्वभूमीवर हा साठा पकडला गेला आहे. महाराष्ट्रातील नक्षलवाद्यांना हा साठा पुरविला जाणार होता का, याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.