‘लोकसत्ता-लोकांकिका’ महाअंतिम फेरी १६ डिसेंबरला

‘लोकसत्ता लोकांकिका’ची यंदाची महाअंतिम फेरी १६ डिसेंबरला माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिरात रंगणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सहज अभिनयाने ‘नायका’ची वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर या महाअंतिम फेरीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनातून स्पर्धकांसमोर नाटय़कलेचे मर्म उलगडणार आहे.

एकांकिकेसाठी कथा निवडून ती बांधण्याआधीच त्या ओघाने येणाऱ्या तयारीचा कुठलाही ताण न घेता रंगभूमीवर येऊन केवळ तुमच्या मनातले नाटय़ सादर करण्याचे अनोखे स्वातंत्र्य देणारा उपक्रम अशी ‘लोकसत्ता लोकांकिका’या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेची ओळख आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर आहे.  ‘लोकसत्ता-लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी आतापर्यंत ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता, ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, मकरंद देशपांडे आणि सतीश आळेकर हे मान्यवर उपस्थित राहिले होते. संवेदनशील अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यंदाच्या महाअंतिम फेरीचे प्रमुख अतिथी आहेत. रंगभूमीपासूनच पालेकर यांचा कलाप्रवास सुरू झाला होता. सत्यदेव दुबे यांच्या प्रायोगिक नाटकांतून ते रसिकांसमोर प्रथम आले.

त्यानंतर ‘आपलं बुवा असं आहे’, ‘काळा वजीर पांढरा घोडा’, ‘गाबरे’, ‘गोची’, ‘पार्टी’, ‘राशोमान’ आदी नाटकांतील त्यांच्या भूमिका रसिकप्रिय ठरल्या होत्या. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हा पालेकर यांचा पहिला मराठी चित्रपट तर बासू चॅटर्जी यांच्या ‘रजनीगंधा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. हा चित्रपट लोकप्रिय ठरला आणि पालेकर यांचा हिंदी रुपेरी पडद्यावरील प्रवास सुरू झाला. त्यांचे ‘चितचोर’, ‘घरौंदा’, ‘बातो बातो मे’, ‘गोलमाल’, ‘नरम गरम’ आदी चित्रपट लोकप्रिय ठरले. हिंदी रुपेरी पडद्यावर पालेकर यांनी साकारलेला मध्यमवर्गीय आणि साधा-भोळा नायक प्रेक्षकांनाही भावला. ‘आक्रित’, ‘कैरी’ या मराठी तर ‘अनकही’, ‘थोडासा रुमानी हो जाए’, ‘दायरा’, पहेली’ आदी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन पालेकर यांनी केले आहे.

अमोल पालेकर यांच्यावर चित्रित झालेली ‘आज से पहेले’, ‘एक अकेला इस शहर मे’, ‘उठे सबके कदम’ आणि अन्यही गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत.

‘लोकसत्ता लोकांकिका’ या ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत, ‘झी युवा’ आणि ‘केसरी टूर्स’ सहप्रायोजित आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या चौथ्या पर्वासाठी आठही केंद्रांवरील प्राथमिक आणि अंतिम फेरीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. येत्या २५ नोव्हेंबरपासून या स्पर्धेचा शुभारंभ होतो आहे. पुण्यात २५ आणि २६ नोव्हेंबरला ‘लोकसत्ता लोकोंकिका’च्या प्राथमिक फेरीला सुरुवात होईल. त्यानंतर २८ आणि २९ नोव्हेंबरला नाशिकमध्ये तर ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला औरंगाबाद येथे प्राथमिक फेरी होईल. मुंबई, नागपूर दोन्ही विभागांत २ आणि ३ डिसेंबरला प्राथमिक फेरी रंगणार आहे.

रत्नागिरीत १ डिसेंबरला प्राथमिक फेरी होईल. तर २ डिसेंबरला ठाण्यात आणि नव्यानेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या कोल्हापूर विभागात प्राथमिक फेरी होईल. स्पर्धेच्या स्वरूपाप्रमाणे आठही विभागांच्या प्राथमिक फेरीतून निवडून आलेल्या नाटकांमध्ये विभागीय अंतिम फेरी होईल. विभागीय अंतिम फेरीच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ५ डिसेंबरला पुणे आणि नाशिकची विभागीय अंतिम फेरी होईल. त्यापाठोपाठ ७ डिसेंबरला औरंगाबाद आणि रत्नागिरी, ८ डिसेंबरला कोल्हापूर आणि मुंबई तर ११ डिसेंबरला नागपूरची विभागीय अंतिम फेरी पार पडेल.

हा महिना संपता संपता ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात होणार असल्याने राज्यभरातील तरुणाईला स्पर्धेची जोरदार तयारी सुरू करावी लागणार आहे.

प्राथमिक फेरी आणि विभागीय अंतिम फेरीचे आव्हान पार करून निवडल्या गेलेल्या आठही विभागांची एकेक एकांकिका ‘लोकसत्ता लोकोंकिका’ हा बहुमान मिळवण्यासाठी मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत लढत देईल. राज्यभरातील आठ शहरांमधून रंगणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना साडेतीन लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. केवळ रोख पारितोषिकेच नाहीत तर स्पर्धेदरम्यान नाटय़-चित्रपट क्षेत्रातील मातब्बर कलावंत, दिग्दर्शकांकडून स्पर्धकांना मार्गदर्शन, ही मोठी पर्वणी असते. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावर प्रथमच पाऊल ठेवणारे अनेक तरुण कलाकार आज मालिका, नाटक-चित्रपटांमधून कार्यरत आहेत. स्पर्धेत अर्ज सादर करूनही एखाद्या महाविद्यालयाने कोणत्याही फेरीत आपले सादरीकरण केले नाही तर पुढील तीन वर्षे त्या महाविद्यालयाला या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. स्पर्धेच्या केंद्रापासून १०० ते दीडशे किलोमीटर अंतर परिसरातील संघांना जवळच्या विभागातून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या या स्पध्रेसाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेंट पार्टनर आहेत.

स्पर्धेचे अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध

एकांकिका स्पर्धा म्हटल्या की बजेटचा प्रश्न तरुणाईच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या रंगमंचावर येण्यासाठी आर्थिक तयारीपेक्षा तुमच्या नाटय़गुणांवरच जोर देणे गरजेचे आहे. नाममात्र प्रवेशमू्ल्याने प्राथमिक फेरीत एकांकिका सादर करण्याची संधी देणारी ही अनोखी स्पर्धा असल्याने जास्तीत जास्त तरुणांना याचा लाभ घेता येईल. स्पर्धेचे प्रवेश अर्जही http://loksatta.com/lokankika2017 या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.