नागपूरहून हैदराबादला निघालेल्या एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यानंतर व समोरचे चाक निखळल्यानंतरही सुरक्षितपणे मुंबईत विमानतळावर उतरवण्यात यश आले आहे. नागपूर धावपट्टीवरून उड्डाण घेताना या विमानाचे एक चाक निखळले होते, त्यामुळे ते मुंबईकडे वळवण्यात आले होते. अखेर हे विमान सुरक्षितपणे मुंबई विमानतळावर उतरले गेले.

आज जेटसर्व एव्हिएशन सी-90 विमान व्हीटी-जेआयएल हे एम्ब्युलन्स फ्लाइटमध्ये रूग्ण घेऊन नागपुरहून मुंबईला निघाले होते. विमान उड्डाण घेत असताना धावपट्टीवर त्याचे चाक निखळले व ते विमानापासून वेगळे होऊन खाली पडले व विमान मुंबईच्या दिशेने गेले. अशी माहिती सिविल एव्हिएशनचे डीजी अरूण कुमार यांनी दिली आहे.

या विमानात क्रू मेंबर शिवाय, रूग्ण व डॉक्टर देखील होते. “आम्ही खरोखरच काळजीत होतो. पायलटला बेली लँडिंग कसे करावे हे सांगण्यात आले आणि ते खूप त्रासदायक होते. देवाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झाले. ऑपरेशन तीन तास चालले, ’’ असंही डीजी कुमार म्हणाले.

विमानाचे पायलट केशरी सिंग यांनी सांगितले की, त्यांना जाणवले की विमानाचे चाक निखळले आहे आणि लँडिंग करण्याअगोदर भरपूर इंधन जाळावे लागेल. मी बेली लँडिंग केलं, मला कल्पना नाही की यामुळे धावपट्टीचे काही नुकसान झाले आहे की नाही. ते पहावे लागेल. मी देवाचे आभार मानतो की सर्वजण सुरक्षित आहेत.