संदीप आचार्य 
मुंबई: करोना संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक असल्याचे सांगाणाऱ्या सरकारने राज्यांतर्गत प्रवासाला परवानगी देताना पुरेशी खबरदारी घेतली नाही. परिणामी कालपर्यंत प्रामुख्याने मुंबई- पुण्यापुरता सीमीत असलेल्या करोनाचा प्रादुर्भाव आता राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दिसू लागला आहे.

राज्यातील ७८ हजार रुग्णांमधील जवळपास ४० हजार रुग्ण एकट्या मुंबईत आजघडीला आहे. मात्र गेल्या दहा दिवसांपूर्वीचे राज्यातील करोनाची व आजची आकडेवारी वेगळे चित्र दाखवत आहे. गेल्या दहा दिवसात मोठ्याप्रमाणात राज्यातील स्थलांतरित मजूर व अन्य कष्टकरी वर्गाने मुंबई- पुण्यातून आपल्या गावची वाट धरली. मिळेल त्या वाहनातून जमेल तसा प्रवास करत गावचं घर गाठल. यातील किती लोकांची प्रवासापूर्वी तपासणी झाली वा तशी काही यंत्रणा राबवली गेली याचे उत्तर नाही असेच असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गेले अनेक दिवस मुंबईतून अन्य राज्यात, त्यातही प्रामुख्याने उत्तर प्रदेश व बिहारमध्ये जाणाऱ्या लाखो स्थलांतरितांच्या दिमतीला राज्याची सारी यंत्रणा जुंपलेली होती. लक्षावधी परप्रांतीय गेल्या काही दिवसात आपापल्या राज्यात निघून गेले आणि याच कालावधीत किंवा त्याच्या थोडे आधी मुंबई-पुण्यात अडकून पडलेल्या अन्य जिल्ह्यातील हजारो लोकांनी आपल्या गावची वाट धरली होती. परिणामी करोनाच्या दुपटीचा वेग आता १६ दिवसांवर गेल्याचे मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना मिरवता येत असले तरी त्याची किंमत राज्यातील अनेक जिल्हे आता मोजू लागले आहेत, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

राज्यातील चौदा जिल्ह्यात जेथे करोनाचा एकही रुग्ण नव्हता अथवा तुरळक रुग्ण होते तेथे स्थलांतरितांमुळे रुग्णसंख्या वाढू लागली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांचे प्रमुख आरोग्य सल्लागार म्हणून ज्यांची नियुक्ती सरकारने केली ते माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी हा धोका पंधरा दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दाखवला होता. याबाबत डॉ. सुभाष साळुंखे यांना विचारले असता “राज्यातील स्थलांतरितांच्या प्रवासाला परवानगी देताना मुंबई पुण्यात यादी करून तपासणी करण्यास तसेच संबंधित जिल्ह्यात १४ दिवस क्वारंटाइन करण्याचा सल्ला आपण दिला होता. मुळातच करोनाच्या चाचणीवरून वेळोवेळी मार्गदर्शक तत्व बदलून तथाकथित तज्ज्ञ उघडे पडले आहेत. कधी लक्षणं नसलेल्यांच्या चाचण्या करा म्हणायचे तर कधी लक्षणं नसलेल्यांच्या चाचण्या करू नका असे फतवे काढायचे. करोनाच्या लढाईत आघाडीवर असलेल्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस तसेच अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्याबाबतही सापत्न भाव दाखवला गेला. त्याचा फटका बसून आज पोलीस व आरोग्य क्षेत्रातील अनेकांना करोनाची केवळ लागण झाली नाही तर मृत्यू झाले आहेत” याकडेही डॉ. सुभाष साळुंखे यांनी लक्ष वेधले.

“उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आता आघाडीवरील या आरोग्य रक्षकांची चाचणी करण्यास सांगितले ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र एवढ्या चाचण्या करण्याची आपली क्षमता आहे का, असा सवाल करून डॉ. साळुंखे म्हणाले, राज्यात आजघडीला ७७ चाचणी प्रयोगशाळा आहेत. त्यांची संख्या वाढून १०० होईल हे गृहीत धरले तरी दिवसाला वीस हजारपेक्षा जास्त चाचण्या होऊ शकत नाही. महाराष्ट्राने देशात सर्वाधिक चाचण्या केल्यानेच रुग्णसंख्या जास्त आढळून आली हे खरे आहे. मात्र आता राज्यांतर्गत स्थलांतरितांना परवानगी देताना काटेकोर काळजी न घेतल्याची किंमत चुकवावी लागणार आहे. सरकारने योग्य पद्धतीने करोनाला मुंबई-पुण्यासारख्या शहरांपुरते सीमित ठेवले होते. त्या सर्वावर आता पाणी पडले आहे” असेही डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

“आता कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने स्थलांतरित गेले आहेत त्याचा मागोवा घेऊन संबंधित जिल्ह्यातील उपजिल्हा व खाजगी रुग्णालयातील पन्नास टक्के खाटांच्या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. राज्यातील खाजगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेऊन करोना व अन्य रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करण्याबाबतचा आदेश सरकारने २१ मे रोजी जारी केला आहे मात्र माझ्या माहितीप्रमाणे संबंधित महापालिका व यंत्रणांनी खाजगी रुग्णालये ताब्यात घेण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलेले नाही”, असेही डॉ. साळुंखे म्हणाले. आता एन पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात पसरणाऱ्या करोनाचा सामना करणे हे एक आव्हान ठरणार आहे. कारण करोनाच्या जोडीने आता मलेरिया, डेंग्यू, स्वाईनफ्लू तसेच चिकनगुनियालाही तोंड द्यावे लागणार आहे.

मुंबई- पुण्यातून मोठ्या संख्येने लोक ठाणे जिल्हा, रायगड, पुणे जिल्हा, कोल्हापूर, औरंगाबाद, अकोला व अमरावतीला गेले आहेत. या बहुतेक ठिकाणी मागील तीन दिवसातील करोना रुग्णांच्या सरकारी आकडेवारीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. २८ मे ते १ जून या कालावधीत ठाणे जिल्ह्यात दीड हजाराने रुग्णसंख्या वाढली तर रायगडमध्ये २०० हून अधिक रुग्ण वाढले. राज्यातील नऊ जिल्ह्यात साधारणपणे गेल्या चार दिवसात सत्तर ते दोनशे रुग्ण आढळून आले असून यातील बहुतेक हे स्थलांतरित असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

शासनाची मागील चार दिवसातील याबाबची आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांच्या म्हणण्यानुसार “रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, पुणे ग्रामीण, कोल्हापूर आदी काही जिल्ह्यात करोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. मात्र राज्यातील स्थलांतराच्या प्रश्नावर यापूर्वी सखल चर्चा झाली असून जिल्हानिहाय क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येणाऱ्या बहुतेक स्थलांतरितांना चौदा दिवस विलगीकरणाखाली ठेवले जात असून संपूर्ण राज्यात सोमवारी विलगीकरणाखाली ७२ हजार लोक होते तर पाच लाख ६७ हजार लोकांना घरीच क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे.” मात्र यात मुंबई- पुण्याचे आकडे वगळले तर राज्यातील स्थलांतरितांची संख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणात क्वारंटाइन झाले नसल्याचे दिसून येईल असे आरोग्य विभागाचेच अधिकारी मान्य करतात. तसेच मुंबई पुण्यातून आलेल्या लोकांची संख्या लक्षात घेता यापुढे ग्रामीण भागाकड जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचेही हे अधिकारी सांगतात.