नवी मुंबईत शिवसेनेतील अंतर्गत वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला असून शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी विरोधीपक्ष नेता विजय चौगुलेंविरोधात जीवे मारण्याचा धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकाराने विजय नहाटा आणि विजय चौगुले गटात सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

विधानसभेसाठी शिवसेने बेलापूर आणि ऐरोली दोन्ही जागांवर पाणी सोडल्याने नवी मुंबई शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यातच दसरा मेळाव्यात शिवसेनेचे जेष्ठ नेते संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना त्रास देणाऱ्यांना सोडू नका, असे स्पष्ट संकेत दिल्याने ऐरोली विधानसभेत उभे राहिलेले गणेश नाईक यांच्या प्रचारापासून शिवसेना चार हात दूरच राहिली आहे. असे असले तरी विरोधीपक्ष नेते विजय चौगुले आणि गणेश नाईक यांचे मनोमिलन झाल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. अशातच बुधवारी विजय चौगुले यांनी त्यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, शिवसेनेच्या शिस्तीप्रमाणे अशा बैठका शहर प्रमुख आयोजित करतात वा त्यांच्या परवानगीने करतात.

चौगुले यांनी आयोजित बैठकीबाबत म्हात्रे यांना चौकशीचे फोन येत होते. याच कारणाने म्हात्रे यांनी व्हाट्सअॅपवर गैससमज दूर होण्यासाठी संदेश पसरवला. या संदेशात अशी कुठलीही बैठक शिवसेनेने आयोजित केली नसल्याचे म्हटले होते. आपल्याला आदेश दिल्याप्रमाणे काम करावयाचे आहे, शिवसेनेची शिस्त भंग होणारे कृत्य केल्यास वरिष्ठ नेत्यांना कळवून योय ती कारवाई केली जाईल, अशा आशयाचा मजकूर या संदेशात होता.

हा संदेश व्हायरल झाल्यावर बुधवारी संध्याकाळी म्हात्रे यांना चौगुले यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या मोबाईलवरून फोन करून धमकी देत तुला पाहून घेईल, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मी व्हायरल केलेली पोस्ट ही कोणाच्याही विरोधात नव्हती तर संभ्रम दूर करणारी होती. मात्र, विजय चौगुले यांनी विनाकारण मला अर्वाच्च भाषेत बोलत बघून घेईल म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मी गुरुवारी याबाबत पोलीस आयुक्तांना भेटून संरक्षणाची मागणी करणार असल्याचे प्रवीण म्हात्रे यांनी म्हटले आहे. याबाबत शिवसेनेचे जेष्ठ नेते व विरोधीपक्ष नेता विजय चौगुले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, तो होऊ शकला नाही.