संदीप आचार्य 
मुंबई: “एका खासगी रुग्णालयातील १७ मृत्यू झाल्याचे समोर आले तेव्हा धक्का बसला. एका दिवसात १७ मृत्यू कसे झाले याची चौकशी केली तेव्हा कळले एप्रिलपासून ची शिल्लक मृत्यूंची माहिती आहे. त्याक्षणी आदेश काढला, ४८ तासात मुंबईतील सर्व रुग्णालयांनी त्यांच्याकडील मृत्यूंची माहिती पालिकेला सादर करावी. त्यानुसार ११ जून रोजी सर्व माहिती समोर आली. डेथ ऑडिट कमिटीने ११ जून ते १५ जूनपर्यंत सर्व मृत्यूंचे विश्लेषण करून करोना मृत्यूंची यादी तयार केली व आम्ही ८६२ मृत्यूंचे विश्लेषण सरकारला सादर केले. यातील बहुतेक मृत्यू हे एप्रिलपासूनचे विश्लेषण न झालेले मृत्यू आहेत” असं आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी सांगितले.

“पालिका आयुक्तपदाचा कार्यभार ८ मे रोजी सायंकाळी घेतला तेव्हापासून एक क्षणभरही विश्रांती घ्यावी असे कधी वाटले नाही. रुग्णांची वाढणारी संख्या, त्यासाठी लागणारे रुग्णालय नियोजन, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचे व्यवस्थापन आदी अनेक आघाड्यांवर एकाच वेळी काम सुरु होते. त्यातच पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा सामना करोना बरोबर करावा लागणार आहे. या सर्वात मृत्यूंचे विश्लेषण करणारी समिती व त्यांचे काम आणि मृत्यूंची नेमकी येत जाणारी माहिती हा विषय तसा फारसा पुढे आला नव्हता. ही तांत्रिक व तज्ज्ञ डॉक्टरांशी संबंधित विषय असून हे काम व्यवस्थित चालले असेल असे वाटले होते. एक दिवस मुंबईतील मृत्यूंची माहिती घेत असताना एका खासगी रुग्णालयात १७ मृत्यू एकाच दिवशी झाल्याचे समोर आले. चौकशी केली तेव्हा एप्रिलपासून झालेल्या मृत्यूंची माहिती त्यांनी सादर केली होती. यातून प्रश्न निर्माण झाला की, मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये शिल्लक मृत्यू किती असतील? यामुळे ८ जूनला आदेश काढून सर्व रुग्णालयांना ४८ तासात त्यांच्या रुग्णालयात झालेल्या सर्व मृत्यूंची माहिती सादर करण्यास सांगितले. खर सांगतो, तोपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यूंची माहिती आमच्याकडे नव्हती. ११ जून रोजी मला कल्पना आली की खूप मोठ्या संख्येने मृतांचे आकडे वा माहिती रुग्णालयांनी दिलेली नाही. ११ जून ते १५ जूपर्यंत ‘डेथ ऑडिट कमिटी’ त्यांच्याकडे आलेल्या मृत्यूंच्या माहितीचे विश्लेषण करत होते. १५ जूनला सायंकाळी चित्र स्पष्ट झाले. एकूण ८६२ मृत्यू हे करोना मृत्यू आहेत. लगेचच त्याची माहिती मुख्य सचिवांना देण्यात आली. मला महापालिका आयुक्त म्हणून काहीच लपवायचे नाही. पालिकेचा कारभार पारदर्शक असला पाहिजे ही माझी भूमिका आहे. त्यामुळे करोना मृतांचे आकडे लपविण्याचा प्रश्नच येत नाही. मुळात मृत्यूंची माहितीच आमच्या समोर रुग्णालयांकडून वेळेत आली नव्हती.”

“खरंतर करोनाच्या कामात डॉक्टरांनाही काही अडचणी आल्या असणे स्वाभाविक आहे. आमचे डॉक्टर दिवसरात्र काम करत आहेत. त्यातील अनेक डॉक्टर व कर्मचार्यांना करोनाची लागण झाल्याने क्वारंटाइन व्हावे लागते. यातूनच अनेकदा अपुरा कर्मचारी वर्गानीशी लढत राहावे लागायचे. अनेक कारण असू शकतात ज्यामुळे करोना मृत्यूंची माहिती डेथ ऑडिट कमिटीपुढे वेळेत आली नसावी, असे सांगून आयुक्त म्हणाले, जे माझ्यापुढे आले ती सर्व माहिती आम्ही आता जाहीर केली आहे. साथीचा उद्रेक ही मोठी घटना असते. करोना मुळे तर सारे जग हादरले आहे. जगातील भल्या भल्या देशांत उपचाराची यंत्रणा उभारताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. अशावेळी मुंबई महापालिकाही निरंतर करोना लढाईत रोजच्या रोज आवश्यक त्या सुधारणा करत आहे व परिणामकारक उपचार व्यवस्था निर्माण करण्यावर भर देत आहोत. त्यामुळे आज जरी मृत्यूंची आकडेवारी कागदावर गेल्या काही दिवसातील दिसत असली तरी ती प्रत्यक्षात एप्रिल पासूनची असून मीच पाठपुरावा केल्याने ती उघडकीस आले” असेही आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी सांगितले.