मार्चमधील तळातून बाहेर येत सध्या थेट ४० टक्के झेपस्तरावर राहणाऱ्या भांडवली बाजाराचा आगामी प्रवास कसा असेल? वर्षअखेपर्यंतच्या सेन्सेक्सच्या ५० हजारी स्वप्नफुग्याला करोना-टाळेबंदीची टाचणी लागेल काय? वा अर्थव्यवस्था सावरत असल्याच्या जागतिक आशेवर सेन्सेक्स व निफ्टी पुन्हा तेजीगिरकी घेतील? या व अशा प्रश्नांची उत्तरे लोकसत्ता अर्थसल्ला मंचावर आज वाचक –गुंतवणूकदारांना मिळणार आहे. बाजार विश्लेषक व अर्थ वृत्तान्तचे स्तंभलेखक अजय वाळिंबे हे या वेबसंवादात सहभागी होणार आहेत.

करोना-टाळेबंदीदरम्यान भांडवली बाजाराने लक्षणीय हालचाल नोंदविली. मार्चमध्ये दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी तळआपटी नोंदविल्यानंतर त्यात आता सुधार दिसू लागला आहे. अर्थव्यवस्थाही आता पूर्वपदावर येण्याची चिन्हे असून या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचे भांडवली बाजाराबाबतचे काय धोरण असायला हवे, याबाबत वाळिंबे मार्गदर्शन करतील. गेल्या काही महिन्यांतील बाजारातील हेलकावे, विपरीत परिणाम करणाऱ्या बाबी तसेच समभागांच्या आगामी खरेदी-विक्रीबाबत कोणत्या बाबींवर लक्ष ठेवावे, याबाबत ते मार्गदर्शन करतील. कंपनी समभागाचे कोणते निकष गुंतवणुकीसाठी उपयुक्त ठरतात, हेही ते नमूद करतील.

सहभागासाठी : https://tiny.cc/LS_Arthasalla_8Sep  येथे नोंदणी आवश्यक.