उद्योजक आनंद मिहद्र आणि जयंत म्हैसकर यांची विशेष उपस्थिती

मुंबई : ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत राज्यातील उद्योगक्षेत्राच्या विकासाचा आढावा घेतला जाणार आहे.

या विशेष उपक्रमात विख्यात उद्योजक आणि महिंद्र समूहाचे प्रमुख आनंद महिंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, प्रसिद्ध उद्योजक व ‘जेनकोव्हल स्ट्रॅटेजिक सव्‍‌र्हिसेस’चे अध्यक्ष दीपक घैसास आणि एमईपी इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जयंत म्हैसकर हे नामवंत औद्योगिक क्षेत्राच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीवर भाष्य करतील.

‘लोकसत्ता’च्या वतीने सोमवार, २६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत कृषी, पायाभूत सुविधा आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेल्या प्रगतीचा ऊहापोह केला जाणार आहे.

विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ आपली भूमिका मांडणार आहेत. ‘उद्योगांसाठी महाराष्ट्र का?’ या विषयावरील चर्चासत्रात राज्यापुढील आव्हानांवर विचारमंथन होईल. महाराष्ट्रातील उद्योगांची स्थिती, उद्योगांसाठीच्या पायाभूत सुविधा, राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणाचे परिणाम आदी विषयांचा ऊहापोह होईल. प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्र यांच्याशी होणारा संवाद हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा असल्यास या विषयांतील संबंधितांनी events.loksatta@expressindia.com या ई-मेलवर नावे नोंदवावीत. निवडक  इच्छुकांनाच कार्यक्रमात प्रवेश देण्यात येईल.

प्रायोजक : या उपक्रमाला महाराष्ट्र सरकारचा माहिती व जनसंपर्क विभाग, एसआरए, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, म्हाडा यांचे सहकार्य लाभले आहे.