महिंद्राच्या कांदिवलीतील कारखान्यात १९९१ मध्ये जेव्हा मी काम सुरू केलं तेव्हा उत्पादन क्षमता वाढवण्यावर माझा भर होता, अशी आठवण आनंद महिंद्रांनी सांगितली. “त्यावेळी आलेला पहिला अनुभव मी अद्याप विसरलेलो नाही. कंपनीच्या कांदिवली येथील कारखान्याच्या गेटवर युनियन लीडर आणि त्याचसोबत खूप लोक होते आणि ते प्रचंड आक्रमक झाले होते. ती वेळ अशी होती की मी पत्नीला फोन करुन सांगितले, की कदाचित तू मला यानंतर पाहू शकणार नाहीस.” अंगावर काटा आणणारा हा अनुभव महिंद्रा उद्योग समुहाचे संचालक आनंद महिंद्रा यांनी सांगितला. एकेकाळी कामगारसंघटनांचा व नेत्यांचा उद्योजकांना त्रास होता का या विषयावर बोलताना त्यांनी ही आठवण सांगितली.

लोकसत्ताच्या अॅडव्हान्टेज महाराष्ट्र कार्यक्रमात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी आनंद महिंद्रा यांची मुलाखत घेतली. याच मुलाखतीत आनंद महिंद्रा यांनी हा अनुभव सांगितला. मात्र त्यानंतर आलेले सकारात्मक अनुभवही त्यांनी सांगितले. “आम्ही कामगार संघटनांशी चर्चा केली, कामगारांना उत्पादकता वाढवण्याचे महत्त्व समजावून सांगितले. आता परिस्थिती अशी आहे की ज्या कांदिवलीत मला असा अनुभव आला होता त्याच ठिकाणची उत्पादकता सर्वाधिक आहे,” असंही आनंद महिंद्रा यांनी सांगितलं.

“आपला देश हा अनेक बदलांना सामोरा जात होता. तो काळ ९० चं दशक संपून ९१ चं वर्ष सुरु झालं होतं तोच होता. त्याच काळात मी महिंद्रामध्ये काम सुरू केलं होतं. कांदिवली कार्यालयाच्या इमारतीबाहेर युनियन लीडर आले होते त्यांच्यासोबत कामगारांचा मोठा जमाव होता. सगळे आक्रमक झाले होते. मात्र आज जेव्हा त्या अनुभवाकडे पाहतो तेव्हा खूप चांगले आणि सकारात्मक बदल झालेले मला दिसतात. नंतरच्या काळात आम्ही प्रकल्प प्रमुख, उत्पान प्रमुख, त्या त्या विभागाचे प्रमुख मग कामगारांशी चर्चा अशी उतरंडीनं कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे अधिकार दिले. त्यामुळे जे आक्रमक झालेले कामगार होते त्यांचा रोष मावळला व प्रत्येक गोष्टीसाठी कंपनीप्रमुखाकडे जाण्याची गरजही राहिली नाही,” महिंद्रा म्हणाले. यानंतरच्या काळात कामगार उत्पादकता वाढवण्यावर ते भर देऊ लागले आणि आजच्या घडीला कांदिवली कार्यालयातल्या कामगारांनी सर्वाधिक उत्पादन क्षमता सिद्ध केली केली आहे, ते म्हणाले.

राजकीय नेत्यांची उद्योजकांना मनधरणी करावी लागते असा सगळ्यांचा अनुभव असतो याबाबत काय सांगाल असा प्रश्न महिंद्रा यांनी विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनुभव सांगितला. “कांदिवली हा विशेष भाग म्हणून जाहीर झाला आहे. तिथं त्याला साजेसा एक प्रकल्प आम्ही घेऊन येतो आहोत. ज्यामध्ये थिएटर, थीम पार्क आणि इतर सगळ्या सोयी सुविधा असतील. हे काही आमचं कार्यक्षेत्र नाही त्यामुळे हे काम आम्हाला जमणार नाही, महिंद्रा ग्रुपला यातली काही संमती मिळणार नाही असं अनेकांना वाटलं होतं. मी जेव्हा याबाबत माहिती घेतली तेव्हा मला कळलं की आमची फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर होती. तेव्हा मी मनाशी हे समजून गेलो होतो की आता नक्की मुख्यमंत्र्यांतर्फे कुणाचा तरी फोन येणार. कार्यालयात भेटायला सांगणारा तो फोन असणार.. कारण मी त्याआधी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटलो नव्हतो. विशेष म्हणजे कोणताही फोन न येता आमची फाईल क्लीअर झाली. मला आश्चर्य वाटलं आणि ती भावना मी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली. तेव्हा ते म्हटले तुमची फाईल फक्त क्लीअरच केली नाही तर अधिकाऱ्यांना हे देखील सांगितलं की जेव्हा महिंद्रांसारख्यांची फाईल येते तेव्हा ते काम जास्तीत जास्त चांगलं कसं होईल याचा विचार करायचा आणि मदत करायची,” आनंद महिंद्रा म्हणाले.

‘लोकसत्ता’च्या वतीने ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमांतर्गत राज्याच्या सर्वागीण विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासाची सद्य:स्थिती आणि प्रगतीची दिशा यांचा वेध घेतला जात आहे. या सत्रात मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी उपक्रमांचे वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ सहभागी आहेत.

‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत कृषी, पायाभूत सुविधा आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेल्या प्रगतीचा ऊहापोह केला जात आहे. विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ या कार्यक्रमात आपली भूमिका मांडत आहेत. राज्यातील पायाभूत सुविधा विकासांची दिशा, महानगरांचे व त्याच्या परिघावरील प्रदेशाचे नियोजन यावर यात विचारमंथन केलं जात आहे.

प्रायोजक..
लोकसत्ता अॅडव्हान्टेज महाराष्ट्र या उपक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, एसआरए, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, म्हाडा यांचे सहकार्य लाभले आहे.