शिवसेनेने राज्यात विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले असले तरी केंद्रात अनंत गीते हे केंद्रीय मंत्रिमंडळात अजूनही आहेत.‘रालोआ’तून बाहेर पडण्याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नसून अजूनही राज्यात सत्तेत जाण्याची आशा शिवसेनेला वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिवसेना व भाजपमधील संबंध तणावाचे असले तरी गेले काही दिवस शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात सुरु होते. सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हावे, यासाठी बोलणी सुरु होती. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी शिवसेना नेते चर्चा करीत होते, तरी किती मंत्रीपदे मिळतील, याविषयी ठोस आश्वासन दिेले गेले नाही. तसेच शिवसेनेचा सन्मान ठेवून त्यांच्या मागणीप्रमाणे विश्वासदर्शक ठरावाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. त्यामुळे अखेर शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले खरे, पण चर्चेचे दरवाजे खुले असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे शिवसेनेला अजूनही सत्तेत सहभागी होण्याची आशा असून त्यामुळेच रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच गीते यांना राजीनामा देण्यासही सांगितले गेलेले नाही. अजून काही दिवस शिवसेना वाट पाहणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच अंतिम निर्णय असल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले.