28 November 2020

News Flash

‘आरे’मध्ये पुरातन अवशेषांचे संशोधन करा

बहि:शाल विभाग व पुरातत्त्वीय केंद्रातर्फे विद्यापीठात ही कार्यशाळा घेण्यात आली.

संशोधकांची मागणी; मेट्रो कारशेडविरोधाला बळ

आरे कॉलनीतील झाडे वाचवण्यासाठी मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या पर्यावरणतज्ज्ञांना आता पुरातत्त्वतज्ज्ञांचीही जोड मिळाली आहे. आरे कॉलनी परिसरात सापडलेल्या पुरातन मंदिर व देवतांच्या अवशेषांमुळे नागरी संस्कृतीवर प्रकाश पडणार आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडसाठी खोदकाम करण्याआधी पुरातन अवशेषांसाठी उत्खनन व संशोधन सरकारने सुरू करावे, अशी मागणी संशोधकांनी शनिवारी शोधन कार्यशाळेत केली. मुंबई विद्यापीठातील बहि:शाल विभाग व पुरातत्त्वीय केंद्रातर्फे विद्यापीठात ही कार्यशाळा घेण्यात आली.

आरे कॉलनीतील हरितसृष्टीच्या बचावासाठी सध्या पर्यावरणवादी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी जोरदार विरोध करत आहेत. या कारशेडसाठी हजारो झाडे पाडण्याची गरज असल्याने तेथील जैवविविधताही धोक्यात येईल. आता कारशेड विरोधकांना पुरातत्त्व संशोधकांचेही पाठबळ मिळाले आहे. मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागामार्फत सध्या संपूर्ण मुंबई-साष्टीच्या पुरातत्त्वीय अवशेषांच्या शोधनकार्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. बहि:शाल विभागाच्या संचालिका मुग्धा कर्णिक, माहिती प्रकल्पाचे संशोधक डॉ. सूरज पंडित, डॉ. कुरूश दलाल, डॉ. अभिजीत दांडेकर, डॉ. प्राची मोघे, ‘लोकप्रभा’चे संपादक विनायक परब आदी संशोधकांनी ठाणे, कान्हेरी गुंफा, वांद्रे, धारावी, गोरेगाव, आरे कॉलनी, दहिसर, मालाड, उत्तन, गोराई अशा भागात संशोधन केले.

  • आरे कॉलनी येथे असलेल्या उल्टनपाडा, बांगोडा, मरोशी पाडा, मटई पाडा, खांबाचा पाडा, चारण देव पाडा, केल्टी पाडा आदी नऊ पाडय़ांच्या आसपास अनेक पुरातन देवी-देवतांची मंदिरे असून यांत वीर, क्षेत्रपाल, म्हसोबा, गावदेवी या देवांच्या जुन्या मूर्ती तसेच मंदिरांमध्ये वापरण्यात येणारे ‘किचका’चे दगड, खांबांचे भग्न अवशेष आढळले. या अवशेषांवरून येथील आदिवासी व अन्य जमातींच्या संस्कृतीचा इतिहास उलगडला जात असला तरी येथे पूर्वी नांदत असलेल्या नागरी संस्कृतीच्या पाऊलखुणा उलगडण्यासाठी संपूर्ण आरे कॉलनी परिसरात संशोधन आवश्यक आहे. मेट्रो कारशेड झाल्यास या गोष्टी लुप्त होण्याचीही शक्यता असल्याने ही कारशेड बांधण्याऐवजी सरकारने येथे उत्खनन व पुरातत्त्वीय अवशेषांचे संशोधन सुरू करावे अशी मागणी या कार्यशाळेत संशोधकांनी केली.
  • या कार्यशाळेत महाराष्ट्रासह मुंबई येथे करण्यात आलेल्या शोधनकार्याचा अहवाल संशोधकांनी सादर केला.
  • यात मुंबईवर राज्य केलेल्या शिलाहार, यादव, सातवाहन, पोर्तुगीज या राजवटींमधील इतिहासावर प्रकाश टाकण्यात आला असून या काळातील शिल्प, शिलालेख, गधेगळ, विरगळ, मंदिरांचे भग्न अवशेष, ख्रिश्चन समाजाचे पोर्तुगीज काळातील क्रॉस, पुरातन विहीरी, कुंड, जुन्या गुंफा तसेच इतिहासपूर्व कालखंडातील अवजारे संशोधकांना मुंबईत सापडली आहेत.
  • पुरातन अवशेषांमुळे मुंबईच्या इतिहासातील अनेक रहस्ये खुली झाल्याचा दावाही संशोधकांनी केला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 2:40 am

Web Title: ancient ruins found in aarey colony
Next Stories
1 रुळांवरील रुग्णसेवेची २५ वर्षे!
2 पावसाची विश्रांती!
3 विद्यापीठाच्या वेतनासह सर्व प्रश्न सोडविणार
Just Now!
X