23 April 2019

News Flash

वाघ-बकरी, पच्चिसी, चतुरंग खेळांशी पुन्हा गाठभेट

चतुरंग हाही एक प्राचीन खेळ असून पाश्चात्त्य देशातील बुद्धिबळ याच खेळावरून साकारला आहे.

चतुरंग हाही एक प्राचीन खेळ असून पाश्चात्त्य देशातील बुद्धिबळ याच खेळावरून साकारला आहे.

मुंबई विद्यापीठात प्राचीन खेळांचा महोत्सव

मुंबई : वाघ-बकरी, पच्चिसी, चतुरंग आदी प्राचीन खेळ खेळण्याची संधी मुंबईकरांना लवकरच मिळणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाच्या वतीने प्राचीन खेळांचा महोत्सव भरविण्यात येणार असून मुंबईकरांना या प्राचीन खेळांचा आनंद लुटता येणार आहे. १६ ते १७ जून या कालावधीमध्ये होणाऱ्या या महोत्सवात प्राचीन खेळांची माहितीही घेता येईल.

महाभारतातील ज्या खेळामध्ये पांडवांनी राज्यापासून ते द्रौपदीपर्यंत सारे हरले तो ‘पच्चिसी’ नावाचा खेळ प्राचीन खेळांच्या कार्यशाळेमध्ये असणार आहे. लगोरी, विटीदांडू या मैदानी खेळासह १२ प्राचीन खेळ या कार्यशाळेमध्ये खेळता येणार आहेत. आत्ताच्या काळातील सापशिडीचा खेळ हा प्राचीन हिंदू धर्मातील ‘ज्ञानचौपर’ खेळावर आधारित आहे. फासे टाकून खेळायच्या या खेळामध्ये पाप आणि पुण्याच्या विविध गोष्टी चौकटींमध्ये मांडलेल्या असतात. दान करणे, पूजा करणे आदी गोष्टी केल्या की पुण्याची शिडी मिळते आणि पापाच्या गोष्टी झाल्यानंतर साप गिळंकृत करतो, अशी या खेळाची संकल्पना आहे. हा खेळ प्राचीन काळी जैन धर्मामध्ये देखील खेळला जात असे. त्याला ‘मोक्षपट’ असे नाव होते.

चतुरंग हाही एक प्राचीन खेळ असून पाश्चात्त्य देशातील बुद्धिबळ याच खेळावरून साकारला आहे. यातील अजून एक प्राचीन खेळ म्हणजे अष्टपट. आठ-आठ चौकोनांमध्ये फासे टाकून खेळायचा हा खेळ बुद्धकाळामध्ये भिक्खू खेळत असत. कालांतराने या खेळावर बंदी आणल्याचे बौद्ध ग्रंथामध्ये नमूद केले आहे. या खेळाचे नियम तसे फारसे कोणाला माहीत नाहीत. मात्र पौराणिक ग्रंथाच्या आधारे तज्ज्ञांच्या मदतीने याचे नवे नियम तयार केले, असे या खेळांचे जाणकार रामेश राघवन यांनी सांगितले.प्राचीन खेळांच्या कार्यशाळेची संकल्पना ही बहि:शाल विभागाच्या प्रदर्शनामधून आकाराला आली. प्रदर्शनामध्ये प्राचीनकालीन खेळ मांडण्यात आले होते. त्या वेळेस अनेक लोकांनी हे खेळ खेळण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, असेही पुढे राघवन यांनी सांगितले.

‘वाघ-बकरी’चा खेळ

त्रिकोणी आकाराच्या वाघ-बकरी या खेळामध्ये तीन वाघ आणि १५ बकरी असतात. वाघाने बकरीला खायचे तर बकऱ्यांनी मिळून वाघाला अडवायचे अशी या खेळाची संकल्पना आहे. पौराणिक काळामध्ये मंदिरांमधील जमिनीवरच हा त्रिकोणीपट रेखाटलेला असे. आत्तापर्यंत प्राचीन खेळांची माहिती ऐकायला मिळत होते. मात्र आता प्रत्यक्षपणे खेळता येणार आहेत, असे बहि:शाल विभागाच्या प्रमुख मुग्धा कर्णिक यांनी सांगितले.

यामधील बहुतांश खेळ साधे असून त्यांचे नवे स्वरूप आपल्याला माहीत आहेत, मात्र याच खेळांचे प्राचीन स्वरूपही तितकेच गमतीशीर आहे. या खेळांची साधने अत्यंत साधी असून सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. एकाच खेळातून अनेक मजेशीर खेळ खेळता येण्यासारखे आहेत.

– ज्ञानेश्वरी कामथ, विद्यार्थिनी

First Published on May 29, 2018 1:54 am

Web Title: ancient sports festival in mumbai university