28 October 2020

News Flash

..अन् जॉर्ज दक्षिण मुंबईतून विजयी झाले !

१९५२ ते ६७ या काळात ते दक्षिण मुंबईचे खासदार होते.

जॉर्ज फर्नांडिस

मुंबई : स. का. पाटील हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. मुंबईतील काँग्रेसचे बडे नेते होते. त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन पंडित नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री व इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळाली होती. १९५२ ते ६७ या काळात ते दक्षिण मुंबईचे खासदार होते. स. का. पाटील यांचा पराभव करणे अशक्य होते. पण १९६२ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोशालिस्ट पक्षाकडून निवडून आलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यात ते यशस्वी ठरले.

निवडणुकीपूर्वी दक्षिण मुंबईत जॉर्ज यांनी सर्वत्र भिंतीपत्रक लावले होते. त्यात ‘स. का. पाटील यांना तुम्ही हरवू शकता‘ एवढाच मजकूर लिहिण्यात आला होता. दक्षिण मुंबईतील चाळी, वस्त्या, मोहल्ले सर्वत्र ही पोस्टर्स झळकली. त्यातून वेगळाच संदेश गेला. त्याचबरोबर चाळी, झोपडय़ा, वस्त्यांमधून जॉर्ज फिरले आणि त्यांनी उच्चंभ्रूची तळी उचलणाऱ्या आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या सदोबा उर्फ स. का. पाटील यांचा पराभव करा, असे आवाहन केले. त्याचा फायदा झाला. त्या निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांना १ लाख ४७ हजार तर स. का. पाटील यांना १ लाख १८ हजार मते मिळाली होती. चाळी, वस्त्या, मराठी वसाहतींमधून जॉर्ज यांना चांगले मतदान झाले होते, असा अनुभव जॉर्ज यांच्याबरोबर अनेक वर्षे काम केलेल्या नंदू धनेश्वर यांनी सांगितला. तुम्ही हरवू शकता या भिंतीपत्राचा तेव्हा जबरदस्त परिणाम झाला होता.

१९६०च्या दशकात मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस  यांच्यासह मृणालताई गोरे आणि शोभना सिंग हे सोशालिस्ट पक्षाचे तीन नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रीय आणि प्रादेशिक भाषांना प्राधान्य मिळाले पाहिजे, असे राम मनोहर लोहिया यांचे धोरण होते. यानुसार मुंबई महानगरपालिकेचा कारभार मराठीतून झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी जॉर्ज फर्नांडिस यांनी केली होती. जॉर्ज यांच्यामुळेच मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात तसेच पालिकेच्या सभेत मराठीचा वापर सुरू झाला होता.

जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली १९७४ मध्ये रेल्वे कामगारांचा संप झाला होता. या संपाच्या दीड वर्षे आधी त्यांची रेल्वे कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. आधीचे अध्यक्ष पिटर अल्वारिस यांच्याच विरोधात जॉर्ज यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढविल्याने त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. निवडणुकीत अल्वारिस यांचा पराभव करून जॉर्ज निवडून आले होते.  कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून फर्नांडिस यांनी रेल्वे कामगारांमध्ये सरकारच्या विरोधात वातावरणनिर्मिती केली होती. ८ मे १९७४ रोजी ऐतिहासिक रेल्वे कामगारांचा संप सुरू झाला. कामगार नेत्यांची धरपकड सुरू झाली. मामा मळगी या मुंबईतील नेत्याचे निधन झाले आणि जॉर्ज यांनी मळगी यांचे बलिदान फुकट जाऊ देणार नाही, असा नारा दिला. पोस्टल कर्मचाऱ्यांचे आंदोलन असो वा महानगरपालिका, संप किंवा आंदोलन किती ताणायचे याचे जॉर्ज यांचे गणित ठरलेले असायचे. यामुळेच प्रत्येक आंदोलनात ते यशस्वी झाले, अशी आठवण धनेश्वर यांनी सांगितली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2019 1:11 am

Web Title: and george fernandes won lok sabha seat from south mumbai
Next Stories
1 मंदिरात चोरी करुन अहमदाबादला पसार झालेल्या पुजाऱ्याला मालाड पोलिसांनी केली अटक
2 खून करुन फरार झालेल्या आरोपीला १५ वर्षांनी अटक  
3 लैंगिक शिक्षण द्या, तरुणांचे भविष्य सुरक्षित करा!
Just Now!
X