मंगळवारी सकाळी ‘कृष्णकुंज’वर फोन खणखणला. नेमका तो राज ठाकरेंनीच उचलला आणि तो फोन थेट ‘मातोश्री’वरून आला असल्याचे कळले.
‘फोन उचलायचा आणि माझ्याशी थेट बोलायचं होतं… चर्चा झाली असती’, असं तू सोमवारी पुण्यातील सभेत म्हणलास. हे वाक्य ते कोणाला उद्देशून म्हणलास आणि कोणी त्याची दखल घ्यायला हवी, हे निवडणुकीच्या हंगामात लोकांना आणि राजकारण्यांनाही वेगळं सांगायला नको, त्यामुळेच लोकांनी ‘चर्चा’ करण्याआधी म्हटलं मीच फोन करतो, उद्धव एका दमात हे सर्व बोलून गेले.
निवडणुकीच्या काळात सर्व लढाया विसरून हातमिळवणी करायची असते. कारण, कधी कुणाच्या प्रवेशाने बाजी पलटेल, हे सांगता येत नाही. आणि हेच उद्धव ठाकरेंनी ओळखलेले दिसते. भाजप नेत्यांनी त्यांची गोची केल्यानंतर आता खुद्द उद्धव ठाकरेंनीच भाजप नेत्यांना कात्रीत पकडायचे ठरवलेले दिसते.
राज ठाकरेंनी भाजप नेत्यांवर केलेल्या आरोपांनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी सोमवार रात्रीपासून कोणीच उपलब्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता राज आणि उद्धव यांनीच एकत्रितपणे कमळावर निशाणा साधण्याची तयारी केल्याची चर्चा सर्वत्र जोर धरू लागली आहे.