सोलापूर ते रायचूर दरम्यान ७६५ केव्ही क्षमतेची अति उच्चदाब पारेषण वाहिनी मंगळवारी रात्री कार्यान्वित झाली आणि उर्वरित भारताचे पॉवर ग्रिड दक्षिण ग्रिडशी जोडले गेले. त्यामुळे आता एक देश आणि एक पॉवर ग्रिड हे लक्ष्य साध्य झाले आहे.
आतापर्यंत दक्षिण भारताचे पॉवर ग्रिड वेगळे होते. राष्ट्रीय ग्रिडमध्ये सामील होण्यास दक्षिणेकडील राज्यांचा विरोध होता. त्याची धार कमी झाली आणि तत्कालीन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात सोलापूर – रायचूर पारेषण वाहिनी टाकण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आता ही उच्चदाब क्षमतेची वाहिनी मंळवारी रात्री साडे दहा वाजता कार्यान्वित झाली. त्यामुळे सारा देश आता एका ग्रिडमध्ये सामावला गेला आहे.
ग्रिड एक झाल्याने आता उर्वरित भारत आणि दक्षिण भारत यांच्यातील विजेचे आदान-प्रदान सुलभ होणार आहे. सध्या १२४ मेगावॉट वीज या पारेषण वाहिनीच्या माध्यमातून दक्षिणेकडे जाण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट २०१४ पर्यंत सुमारे दोन ते अडीच हजार मेगावॉट विजेचे वहन या माध्यमातून होईल, असा अंदाज आहे.