मुंबईत आग लागण्याचे सत्र काही संपताना दिसत नाहीये. आता अंधेरी येथील एका लाकडाच्या गोदामाला आग लागली. संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एस. व्ही. रोड भागात असलेल्या टिंबर मार्ट या लाकडाच्या गोदामाला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळावे यासाठी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ३ फायर इंजिन आणि ३ वॉटर टँकर घटना स्थळी दाखल झाले आहेत. पश्चिम रेल्वेच्या रुळाला लागूनच हे गोदाम आहे. त्यामुळे या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या आगीचा परिणाम लोकल सेवेवर होईल अशीही शक्यता वर्तवली जात होती. मात्र पश्चिम रेल्वेची सेवा सुरळीत सुरु असल्याचे समजते आहे.

आग लागल्याने एस.व्ही रोड परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आधीच या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या असतेच त्यात आगीचे संकट समोर आल्याने आणखी कोंडी झाली आहे. ज्या ठिकाणी आग लागली आहे त्या ठिकाणापासून जवळच लाकडाची गोदामे आणि दुकाने आहेत. त्यामुळे या आगीची झळ या दुकानांनाही बसण्याची शक्यता आहे. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहेत.

कमला मिल येथील मोजो ब्रिस्ट्रो आणि वन अब्हव या दोन रेस्तराँना लागलेल्या आगीत १४ लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुंबईत आग लागण्याचे सत्र थांबताना दिसत नाहीये. मंगळवारी सकाळीच रे रोड परिसरात आग लागली ज्या आगीत काही गोदामे भस्मसात झाली. तर मुंबईतील सत्र न्यायालय परिसरात सोमवारी आग लागली होती. तिसऱ्या मजल्यावर लागलेली ही आग अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांनी नियंत्रणात आणली. सकाळची वेळ असल्याने न्यायलय बंद होते त्यामुळे याही आगीत जीवितहानी झाली नाही.

रविवारीही कांजुरमार्गावरील सिनेव्हिस्टा स्टुडिओत लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला होता. ४ जानेवारी रोजी अंधेरीत वातानुकूलन यंत्रामध्ये लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. मैमून मंजिल येथे ही घटना घडली होती. त्यापूर्वी २९ डिसेंबर रोजी कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह व मोजो ब्रिस्टो या पबमध्ये आग लागल्याने १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर १८ डिसेंबर रोजी साकीनाका भानू फरसाण मार्टमध्ये लागलेल्या आगीत १४ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.