पालिकेने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे रहदारीचा बोजवारा

मुंबई : घाटकोपर अंधेरी जोड रस्ता शुक्रवारी दुपारी अचानक पालिकेने वाहतुकीसाठी बंद केला. कोणतीही पूर्वसूचना न देता हा मार्ग बंद केल्यामुळे संध्याकाळी या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा हा मार्ग बंद झाल्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

घाटकोपर-अंधेरी जोड मार्गावर घाटकोपर डेपोजवळ असलेल्या लक्ष्मीबाग नाल्यावरील पूल धोकादायक ठरवण्यात आला आहे. त्यामुळे हा संपूर्ण रस्ता शुक्रवारी पालिकेने बंद केला. हिमालय पूल दुर्घटनेनंतर महानगर पालिकेने शहरातील पुलांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली असून त्यात हा पूल अतिधोकादायक ठरविण्यात आला आहे. पालिकेच्या पूल विभागाने हा पूल अतिधोकादायक असून तो तात्काळ बंद करण्यासाठी एन प्रभागाला १७ मे रोजी पत्र दिले होते. मात्र या काळात कोणताही निर्णय न घेता एन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पूल वाहतुकीसाठी बंद केला. कोणतीही पूर्वसूचना न देता पूल बंद केल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.

पश्चिम उपनगरात जाणारा हा प्रमुख मार्ग असून बेस्टला देखील याबाबत काही सूचना दिली नव्हती.   अंधेरीकडून येणाऱ्या वाहनांना मोठा वळसा घालून पूर्व द्रुतगती मार्गावर यावे लागत होते. त्यामुळे या परिसरातील अंतर्गत मार्गावरही मोठी कोंडी झाली होती. त्यातच पूर्व द्रुतगती मार्गावरून अंधेरीकडे जाणाऱ्या वाहनांनाही वळसा घालून जावे लागत असल्याने मोठा गोंधळ उडाला होता.

घाटकोपर अंधेरी लिंक रोड, लाल बहादूर शास्त्री मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, घाटकोपर रेल्वे स्थानक परिसर संपूर्णपणे वाहतूक कोंडीमुळे जाम झाला. हा रस्ता शहरातील महत्त्वांच्या रस्त्यांपैकी एक असल्याने उद्या पुन्हा या पुलाची तपासणी आयआयटीच्या तज्ज्ञांमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआटीने जर हलकी वाहने चालवण्यास परवानगी दिली तर वाहतूक सुरू करण्यात येईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.