23 January 2020

News Flash

अंधेरीच्या गोखले पुलाची पुनर्बांधणी

जुन्या पुलाच्या उताराचा भाग बांधण्यासाठी ८७ कोटी खर्च

|| इंद्रायणी नार्वेकर

जुन्या पुलाच्या उताराचा भाग बांधण्यासाठी ८७ कोटी खर्च

अंधेरीच्या गोखले पुलाचा भाग पडून झालेल्या दुर्घटनेला एक वर्ष झाल्यानंतर आता या पुलाची पुनर्बाधणी करण्याचे पालिकेने ठरवले आहे. या पुलाच्या रेल्वे ट्रॅकवरील भाग रेल्वे प्रशासनाने दुरुस्त केला असून पालिका आता दोन्ही बाजूंचा उताराचा भाग पाडून नव्याने बांधणार आहे. त्याकरिता पालिकेने निविदा मागवल्या आहेत. पुलाच्या पुनर्बाधणीसाठी दोन वर्षे लागण्याची शक्यता असून त्याकरिता अंदाजित ८७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या या दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात ३ जुलै रोजी अंधेरी स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या गोखले पुलाचा भाग ट्रॅकवर पडून मोठी दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत दोन जण दगावले होते, तर पश्चिम रेल्वेची वाहतूकही एक दिवस बंद ठेवावी लागली होती. या दुर्घटनेनंतर रेल्वे ट्रॅकवरील सगळ्याच पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यामुळे रेल्वेवरील सगळ्या पुलांची संरचनात्मक तपासणी रेल्वेने करवून घेतली होती. दुर्घटनेनंतर रेल्वेने या पुलाची दोन्ही बाजूंची मार्गिका बंद ठेवली होती. मार्गिका दुरुस्त करून नुकतीच ती पादचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. आता या पुलाच्या उताराच्या भागाची पुनर्बाधणी करण्याचे पालिकेने ठरवले आहे. रेल्वेवरील पुलाची दुरुस्ती करताना ट्रॅकवरील भागाची दुरुस्ती किंवा बांधणी ही रेल्वेतर्फे केली जाते तर उताराचा भाग पालिका बांधत असते. त्यानुसार या पुलाच्या दोन्ही बाजूंचा उतार पालिकेतर्फे बांधला जाणार आहे. या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या पुलाची पुनर्बाधणी करताना या परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका वेळेला एक बाजू बंद करून या पुलाचे काम केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पुलाचा मधला भाग उत्तम स्थितीत असून उतार बाजूच्या भागाचे लोखंडी भाग मात्र गंजले आहेत. अंधेरी पश्चिम दिशेला एसव्ही रोडपर्यंत तर पूर्वेला तेली गल्लीपर्यंत हा उताराचा भाग आहे. पालिका प्रथमच अशा पद्धतीने पुलाच्या उताराच्या भागाची पुनर्बाधणी करणार आहे. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर या वर्षांअखेरीस कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

First Published on July 23, 2019 3:08 am

Web Title: andheri gokhale bridge collapse mpg 94
Next Stories
1 दुसऱ्या यादीत ‘कटऑफ’मध्ये एका टक्क्याची घट
2 यंत्रणेतले ‘शेखचिल्ली’
3 मालेगाव बॉम्बस्फोट खटला कधीपर्यंत संपणार?
Just Now!
X