अंधेरी-गोरेगाव हार्बर विस्तारीकरण जोगेश्वरीजवळ अडकले
काही वर्षांपूर्वी दारूबंदीसाठी सरकारने प्रसिद्ध केलेले ‘दारूचा पाश करी संसाराचा नाश’ हे घोषवाक्य प्रचंड गाजले होते. सध्या मात्र या ‘दारू’ने मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या (एमआरव्हीसी) एका प्रकल्पाभोवती आपला पाश टाकला असून त्यामुळे लाखो प्रवाशांच्या सुखकर प्रवासाचा नाश होत आहे. हार्बर मार्ग अंधेरी ते गोरेगाव यांदरम्यान विस्तारित करण्याचा एमआरव्हीसीचा प्रकल्प जोगेश्वरी येथील एका दारूच्या गुत्त्यामुळे अडकून पडला आहे. अंधेरी येथील प्लॅटफॉर्म सहा आणि सात यांचे स्थलांतर झाल्यानंतर आता केवळ या दारूच्या गुत्त्याचा अडथळा आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ते निकालात कधी लागते, याकडे लाखो प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
एमयूटीपी-२ या योजनेंतर्गत हार्बर मार्गाचा विस्तार गोरेगावपर्यंत करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यासाठी अंधेरी स्थानकाची पुनर्रचनाही करण्यात आली. तसेच गोरेगाव, ओशिवरा, जोगेश्वरी येथेही हार्बर मार्गाचे प्लॅटफॉर्म बांधण्यात आले. अंधेरी-जोगेश्वरी यांदरम्यान रेल्वेमार्ग तयार झाला असून जोगेश्वरी ते गोरेगाव यांदरम्यानही वेगाने काम सुरू आहे. मात्र जोगेश्वरी पश्चिम येथे अंधेरीच्या बाजूला असलेल्या एका दारूच्या गुत्त्यामुळे अंधेरी-जोगेश्वरी यांदरम्यानचे काम खोळंबले आहे. रेल्वे हद्दीत असलेल्या या गुत्त्याच्या मालकाने तो हटवण्यास नकार दिल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यामुळे न्यायालयातून त्यावर निर्णय होत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प खोळंबून राहणार आहे.
दरम्यान, हार्बर मार्गावर १२ डब्यांचा गाडय़ा थांबण्यासाठी अंधेरी स्थानकातील हार्बर मार्गाचा फलाट अपुरे असल्याने आणि हा मार्ग गोरेगावपर्यंत विस्तारीत करायचा असल्याने हा फलाट तोडण्यात आला. त्यासाठी पश्चिम रेल्वेने घेतलेला विशेष ब्लॉकही यशस्वी झाला असून आता नव्याने सुरू झालेल्या फलाट क्रमांक सहा-सात येथून हार्बर तसेच पश्चिम रेल्वेच्या सेवा चालू झाल्या आहेत.

हार्बर गाडय़ा अंधेरीसाठीही १२ डबा!
अंधेरी येथील प्लॅटफॉर्मच्या पुनर्रचनेचे काम पूर्ण झाल्यामुळे आता या स्थानकापर्यंत हार्बर मार्गाने येणाऱ्या गाडय़ा १२ डब्यांच्या चालवण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या आठवडय़ाभरात अंधेरीपर्यंत येणाऱ्या गाडय़ा १२ डब्यांच्या करण्यात येणार असल्याचे संकेत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले.