जेव्हीएलआर येथील हिल क्रिस्ट इमारतीजवळ वेरावली जलाशयाचा भरणा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे वांद्रे ते जोगेश्वरी आणि कुर्ला, घाटकोपर परिसराला तीन दिवस पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांना थेट रविवारी पाणी पुरवठा होऊ शकणार आहे.

२९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास जेव्हीएलआर येथील हिल क्रिस्ट इमारतीजवळ मेट्रो ६ साठी खोदकाम सुरू असताना वेरावली जलाशयास जोडली गेलेली १८०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे या संपूर्ण परिसरातील पाणी पुरवठा बंद झाला होता. पश्चिम उपनगरात वांद्रे पासून ते थेट जोगेश्वरीपर्यंत आणि कुर्ला व घाटकोपरचा पश्चिम भाग यांना गेल्या तीन दिवसांपासून पाणी पुरवठा होऊ शकला नाही. या जलवाहिनीतून मोठय़ा प्रमाणावर पाणी वाहून गेल्यामुळे पाणी थांबल्यानंतर प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात झाली. त्यानंतर शनिवारपासून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. शनिवारी मध्यरात्री दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागाने कळवले आहे.

तीन दिवस पाणी पुरवठा बंद असल्यामुळे या संपूर्ण मोठय़ा परिसरातील लोकांचे पाण्याशिवाय हाल झाले. बुधवारच्या या घटनेनंतर पाण्यासाठी लोक रस्त्यावर आल्यानंतर पालिकेने शुक्रवारी रात्रीपासून नागरिकांसाठी पाण्याची पर्यायी व्यवस्था सुरू केली. पाण्याचे टँकरही मिळेनासे झाल्यानंतर पालिकेचे पाण्याचे टँकर विनाशुल्क भरण्याची व्यवस्था सुरू केली. वाद्रे (पश्चिम) येथे भाभा रुग्णालय, सांताक्रुझ (पूर्व) येथे वाकोला गावदेवी टनेल, वाकोला आणि मालाड (पश्चिम) येथे लिबर्टी गार्डन या ठिकाणी पाण्याचे टँकर विनाशुल्क भरण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. वांद्रे अंधेरी, जोगेश्वरी, घाटकोपर (पश्चिम), कुर्ला (पश्चिम) या भागातील बाधित परिसरात नागरिकांना टँकर्सच्या एकूण ४९५ फेऱ्यांद्वारे तात्पुरता पाणीपुरवठा करण्यात आला आहे. नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात येत आहे.