गॅस दुरुस्तीच्या बहाण्याने घरात घुसून गॅस कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यासह एका नवविवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अंधेरीमधील एका पाच मजली इमारतीत मंगळवारी ही घटना घडली.
अंधेरीमधील या इमारतीत १९ वर्षीय पीडित महिला पतीसमवेत राहते. पाचच महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही महिला घरात एकटी असताना गॅस कंपनीचा कर्मचारी चंदन जैस्वाल (१९) आपला सहकारी महम्मद आलम महम्मद अस्लम शेख (३५) याला घेऊन आला. गॅसची गळती होते की नाही हे तपासायचे आहे, असे सांगून ते दोघे घरात शिरले. घरात शिरताच त्यांनी दार लावून या महिलेवर बलात्कार केला. बलात्कारानंतर त्यांनी गळा दाबून तिला मारण्याचाही प्रयत्न केला. जाताना घरातील रोख रक्कमही घेऊन ते पसार झाले. थोडय़ा वेळाने ही महिला शुद्धीवर आली. महिलेचा पती घरी आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्यावर बलात्कार, चोरी आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैस्वाल हा अंधेरी पूर्व येथील गॅस कंपनीत मेकॅनिक आहे. महिला घरात एकटी असते हे त्यांनी यापूर्वीच पाहून ठेवले होते. दोन्ही आरोपींना ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.