मुंबई : नववर्षांच्या पूर्वसंध्येला अंधेरी परिसरात सुरू असलेल्या ‘पिंक प्लाझा’ डान्स बारवर कारवाई करत पोलिसांनी २४ पीडित मुलींची सुटका केली आहे. नववर्ष स्वागतासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अश्लील गाण्यांवर या मुली नृत्य करत होत्या. अंधेरी पोलिसांनी मंगळवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई केली.

याप्रकरणी पोलिसांनी बारचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि सात ग्राहक यांना अटक केली आहे. रवीराज पुजारी असे अटक केलेल्या व्यवस्थापकाचे, तर राजकुमार मुखिया असे रोखपालाचे नाव आहे. बारचा मालक नरेंद्र राजू शेट्टी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.  पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे यांच्या पथकाने मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास बारवर छापा घातला. या वेळी सुमारे २४ मुली अश्लील गाण्यावर नृत्य करताना पोलिसांना आढळून आल्या. या मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे.