मुंबई : सरकता जिना अचानक उलटा फिरल्याने प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकात घडली. त्यामुळे प्रवाशांची गडबड उडाली. या घटनेनंतर १७ सरकत्या जिन्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

उपनगरीय प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर सरकते जिने बसविण्यात आले असले तरी त्यातील बिघाडाच्या घटनाही वारंवार घडत आहेत. अंधेरी स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरील अशा बिघडलेल्या सरकत्या जिन्यावर प्रवासी चढत असताना हा जिना वरच्या दिशेने जाण्याऐवजी अचानक खालच्या दिशेने गेल्याने प्रवाशाचा तोल जाऊन तो पडला आणि जखमी झाला. त्याच्यावर स्थानकावर असलेल्या आपत्कालीन वैद्यकीय केंद्रामध्ये उपचार करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

ब्रेक यंत्रणेत बिघाड किंवा मोटर कपलिंग यंत्रणा फेल होऊन सरकत्या जिन्याची मोटर उलट दिशेने फिरली. त्यानंतर या स्वयंचलित जिन्याच्या अन्य यंत्रणा कार्यान्वित झाल्याने सरकता जिना आपोआप बंद झाल्याचेही पश्चिम रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. या घटनेनंतर अशा तंत्राच्या १७ सरकत्या जिन्यांची दुरुस्ती तातडीने करून मोटर बदलण्याचा निर्णय घेतल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.