सहा महिन्यांमध्ये तांत्रिक कामे पूर्ण करून सेवा वाढवणार

गेल्या काही वर्षांमध्ये अंधेरी ते विरार या क्षेत्रात वाढलेल्या प्रवाशांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन आता पश्चिम रेल्वेने अंधेरी ते विरार यांदरम्यानच्या आपल्या सेवांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या अप आणि डाउन मार्गावर मिळून अंदाजे ११४० सेवा धावतात. त्यात आणखी दहा सेवांची भर टाकण्याचा प्रयत्न पश्चिम रेल्वे करत आहे. त्यासाठी आवश्यक अशा तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच या सेवा वाढवल्या जातील.

अंधेरी येथील सिप्झ, गोरेगाव आणि मालाड येथे फोफावलेली कॉर्पोरेट कार्यालये यांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये नोकऱ्यांचे प्रमाण पश्चिम उपनगरांमध्ये वाढले. त्यातच मालाड येथील डायमंड मार्केटमधील व्यापार वाढल्याने मालाड येथील प्रवासी संख्येतही वाढ झाली. त्याचबरोबर नालासोपारा, मीरारोड, भाईंदर, वसई रोड, विरार या स्थानकांच्या आसपास मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिल्याने या भागातील प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. अंधेरी-घाटकोपर यांदरम्यान मेट्रो सुरू झाल्याने विरार किंवा बोरिवलीहून अंधेरीपर्यंत येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही कमालीची वाढ झाली आहे.

या प्रवासी संख्येचा विचार करून भविष्यकाळात पश्चिम रेल्वेने अंधेरी ते विरार यांदरम्यानच्या आपल्या सेवांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या क्षेत्रात अंधेरी-बोरिवली, अंधेरी-विरार आणि बोरिवली-विरार यांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर मिळून किमान १० जादा सेवा चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे, असे पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी ‘लोकसत्ता मुंबई’शी बोलताना सांगितले.

तांत्रिक बदल काय?

सध्या पश्चिम रेल्वेमार्गावर क्षमतेपेक्षा जास्त सेवा धावत आहेत. त्यामुळे अंधेरी-विरार या भागात अधिक सेवा चालवण्यासाठी वेळापत्रकात मोठय़ा प्रमाणात बदल आणि फेरफार करावे लागणार आहेत. हे बदल करताना सध्या धावणाऱ्या गाडय़ांची वेळ किंवा सुरुवातीचे स्थानक, यात बदल केल्यास तेथील प्रवाशांचा रोष ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही कसरत पश्चिम रेल्वेला सांभाळावी लागणार आहे. त्याचप्रमाणे बोरिवली ते खार रोड यांदरम्यान पश्चिम रेल्वेची पाचवी मार्गिका तयार आहे. या मार्गिकेवरून ईएमयू लोकल सेवा धावण्यासाठी त्यात ओव्हरहेड वायरपासून इतर अनेक तांत्रिक बदल करणे गरजेचे आहे. या मार्गावरून गाडी धावल्यास इतर चार मार्गिकांवर अजिबात ताण येणार नाही. तसेच १०पेक्षा जास्त सेवांचा समावेशही करणे कदाचित शक्य होईल. हे बदल करण्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल.

railway-cart

पश्चिम उपनगरांतील मेट्रो प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अंधेरी ते बोरिवली किंवा अंधेरी ते विरार यांदरम्यानच्या प्रवासी संख्येचा भार पश्चिम रेल्वेवरच आहे. हा भार पेलण्यास सक्षम होण्यासाठी तांत्रिक कामे सुरू आहेत.

– मुकुल जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (पश्चिम रेल्वे, मुंबई)