राज्य आघाडीचे करण्याचा चंद्राबाबू यांचा विश्वास, आनंदीबेन यांचे उद्योजकांना निमंत्रण

‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी असा राज्याचा प्रयत्न असला तरी शेजारील गुजरात आणि आंध्र प्रदेश सरकारांच्या मुख्यमंत्र्यांनी थेट महाराष्ट्रालाच आव्हान दिले आहे. उद्योग आणि गुंतवणुकीत महाराष्ट्राला मागे टाकत आंध्र प्रदेश क्र. १चे राज्य होईल, असा निर्धार आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी केला.

विदेशी गुंतवणुकीचे प्रस्ताव सादर होणे आणि त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये गुजरातच आघाडीवर असल्याचे सांगत आनंदीबेन यांनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले. नवीन राज्य असले तरी यंदा दुसऱ्या क्रमांकावर असलेले आंध्र प्रदेश राज्य गुंतवणूक आणि उद्योग क्षेत्रात पुढील वर्षी पहिला क्रमांक गाठेल, असा ठाम विश्वास चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला.

राज्यात गुंतवणुकीचे सहा लाख कोटींचे सामंजस्य करार झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जाहीर केले. तसेच देशात महाराष्ट्रच पहिल्या क्रमांकाचे राज्य असेल, असा विश्वास व्यक्त केला होता; पण फडणवीस यांच्या दाव्याला छेद देत आनंदीबेन आणि चंद्राबाबू या दोन मुख्यमंत्र्यांनी स्पर्धेत आम्हीच महाराष्ट्राच्या पुढे आहोत, असे चित्र निर्माण केले. आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर आंध्र प्रदेश राज्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. तरीही गेल्याच महिन्यात चार लाख, ७० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. संयुक्त आंध्रचे मुख्यमंत्री असताना आपण हैदराबादचा कायापालट केला होता. विभाजनानंतर मूळ आंध्रचा त्याच धर्तीवर विकास करण्यात येईल, असे जाहीर केले.

जागतिक बँकेच्या गेल्या वर्षीच्या अहवालात व्यवसायपूरक राज्यांमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकाचे, तर आंध्र प्रदेश दुसऱ्या क्रमाकांचे राज्य आहे. यावर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी भर दिला. उभय मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त व्यवसायपूरक वातावरण तयार करून गुंतवणूक व उद्योग क्षेत्रात आपापली राज्येच पुढे येतील, असा दावा करीत महाराष्ट्राला आव्हान दिले.  गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता असून, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू यांचा तेलगू देशम पक्ष भाजपप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीत आहे. महाराष्ट्राला भाजप किंवा भाजपच्या मित्रपक्षांकडूनच आव्हान देण्यात आले आहे.