महावितरणच्या पाहणीत गुजरातच्या सौरपंपांचा दर्जा उत्तम असल्याचे निष्पन्न
गुजरातने स्वस्तात खरेदी केलेल्या सौरपंपाचा दर्जा उत्तम असल्याचे महावितरणच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्याचबरोबर केवळ गुजरातच नाही, तर आंध्र प्रदेशनेही महाराष्ट्रापेक्षा स्वस्त दरात सौरपंपांची खरेदी केल्याचे दिसून येत आहे. आंध्र प्रदेशमध्ये पाच अश्वशक्ती क्षमतेचा सौरपंप चार लाख ३० हजार रुपयांना खरेदी करण्यात आल्याने त्या तुलनेत महाराष्ट्रातील खरेदी लाखभराहून अधिक महागच पडला आहे. त्यामुळे या खरेदीत गैरव्यवहार असल्याच्या आरोपांना पुष्टी मिळत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सौरपंप खरेदीचे भवितव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावर अवलंबून आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्ता स्थापन केल्यावर पाच वर्षांत पाच लाख सौरपंप पुरविण्याची महत्वाकांक्षी घोषणा केली. पण प्रायोगिक तत्वावर १० हजार पंपांची करण्यात येत असलेली खरेदीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यासंदर्भात ‘लोकसत्ता’ ने वृत्त प्रकाशित केल्यावर त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये खरेदी करण्यात आलेला पाच अश्वशक्ती क्षमतेचा सौरपंप साडेतीन लाख रुपयांमध्ये असताना महाराष्ट्राने तब्बल साडेपाच लाख रुपये त्यासाठी मोजले आहेत. गुजरातमध्ये ८० टक्के रक्कम पंप बसविल्यावर आणि २० टक्के रक्कम बँकहमी घेऊन देण्यात येत आहे. तर महाराष्ट्रात ६० टक्के रक्कम पंप बसविल्यावर आणि दर तिमाहीला दीड टक्के अशी ३० टक्के रक्कम दिली जाईल. पाच वर्षे देखभाल दुरुस्तीची अट गुजरात व महाराष्ट्रात समानच आहे.
गुजरातच नव्हे, तर आंध्रप्रदेशनेही पाच अश्वशक्ती क्षमतेचा पंप चार लाख ३० हजार रुपयांना खरेदी केला आहे. तेथेही गुजरातप्रमाणेच ८० टक्के रक्कम पंप बसविल्यावर, १० टक्के रक्कम बँक हमीनंतर आणि १० टक्के रक्कम पाच वर्षांनी दिली जाईल. पाच वर्षे देखभाल व दुरुस्तीची अट गुजरात, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या तीनही राज्यांमध्ये समान आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महावितरणची पंपांची खरेदी महागात पडल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुजरातमधील सौरपंपांचा तांत्रिक दर्जा आणि खरेदी प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी जाण्याचे निर्देश दिले होते. तोपर्यंत निविदाप्रक्रियेला अंतिम स्वरुप देऊन करार न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या उच्चपदस्थांनी गुजरातमधील सौरपंपांचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केला आहे. या सौरपंपांचा दर्जा चांगला असून शेतकऱ्यांना व्यवस्थित पाणी मिळत असल्याचे या अधिकाऱ्यांना पाहणीत आढळून आले आहे. सौरपंपांची तांत्रिक तपासणी केली नसली तरी पाचवर्षे देखभाल दुरस्तीची जबाबदारी पुरवठादार कंपनीची असल्याने वीजकंपनीला चिंता करण्याचे कारण नाही. पण आता निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्याबाबत कोणता निर्णय घ्यायचा, हे मुख्यमंत्री फडणवीस आणि उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची चर्चा झाल्यावरच ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावरच खरेदीचा निर्णय अवलंबून असून ते महागडय़ा खरेदीला हिरवा कंदील दाखविणार की नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश देणार, हे दोन आठवडय़ात स्पष्ट होणार आहे.