अंगणवाडी सेविका आक्रमक, पंकजा मुंडे यांना शेकडोंनी पत्रे

आम्ही परित्यक्ता आहोत, विधवा आहोत, घराची जबाबदारी आमच्यावर असून ऐंशीच्या दशकात आम्ही अंगणवाडी सेविका म्हणून कामास सुरुवात केली. आता सरकार एका आदेशाने आमचे निवृत्तीचे वय ६० करणार असेल तर आम्ही जगायचे कसे, असा सवाल अंगणवाडी सेविकांनी केला आहे. हे सारे कमी ठरावे म्हणून आमची सेवा अत्यावश्यक कायद्यांतर्गत (मेस्मा) आणण्याचा जुलमी आदेश काढण्यात आला असून तो रद्द न केल्यास आम्ही आत्मदहन करू, अशी शेकडो पत्रे महिला व बालविकास खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना पाठविण्यात आली आहेत. केवळ आमचेच नव्हे तर या लाखो बालकांचेही जगणे या सरकारने कठीण करून ठेवल्याचे अनेक महिलांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

महिला व बालविकास विभागाने अंगणवाडय़ांची संख्या कमी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय ६५ वरून ६० करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुमारे १३ हजार अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ आली असून, सरकारकडून तीस वर्षांहून अधिक काळ सेवा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अवघे एक लाख रुपये देण्यात येतात. यातील बहुतेक महिला या परित्यक्ता, विधवा तसेच एकाकी राहणाऱ्या असून सरकारने निवृत्तीचे वय कमी करण्याचा व मेस्मा लागू करण्याचा निर्णय रद्द न केल्यास आम्ही आत्मदहन करू, असा इशारा देणारी शेकडो पत्रे या अंगणवाडी सेविकांनी पंकजा मुंडे यांना पाठवली आहेत. ‘एकीकडे हे सरकार अंगणवाडीमधील सहा वर्षे वयापर्यंतच्या मुलांच्या पोषण आहाराची वेळेवर व्यवस्था करत नाही. त्यांची आठशे कोटी रुपयांहून अधिक रक्कम थकविल्यामुळे बचतगटांनाही पोषण आहाराचा पुरवठा करणे अशक्य झाले आहे. अशा वेळी अंगणवाडी सेविका स्थानिक किराणा दुकानातून उधारीवर सामान घेऊन पोषण आहार देण्याचे कर्तव्य करत असते. अंगणवाडय़ांमध्ये साधी नोंदणी पुस्तके सरकार वेळेवर देऊ शकत नाही की आमचे मानधनही वेळेवर दिले जात नाही. मात्र आम्ही बालकांना डावाला लावून संप करतो, असा आरोप सरकारकडून के ला जातो. अंगणवाडी सेविकाच नव्हे तर येथील लाखो बालकांवर हे सरकार अन्याय करत असताना आता अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’अंतर्गत आणले जाते,’ असे राज्य अंगणवाडी कृती समितीचे नेते एम. ए. पाटील यांनी सांगितले. यासाठी मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना ‘कर्मचारी’ म्हणून शासकीय आदेशात म्हटले जाते. जर अंगणवाडी सेविका या कर्मचारी असतील तर सरकार त्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार का, असा सवालही एम. ए. पाटील यांनी उपस्थित केला.

सरकारनेच अंगणवाडय़ांची संख्या कमी करण्यासाठी निवृत्तीचे वय ६५ वरून ६० करून लाखो बालकांना तर डावाला लावलेच आहे, परंतु हजारो भगिनींना उद्ध्वस्त करण्याचा तुघलकी निर्णय घेतला आहे. यामुळे शेकडो संतप्त महिलांनी महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे आत्मदहन करणार असल्याची पत्रे पाठवली असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंबरोबर बैठक

राज्य अंगणवाडी कृती समितीच्या सदस्यांची सोमवारी शिवालय येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत अंगणवाडी सेविकांच्या समस्येसंदर्भात एक बैठक होणार आहे. अंगणवाडी सेविकांचे वय कमी करण्याचा निर्णय रद्द करणे, मेस्मा रद्द करणे, अंगणवाडय़ा सक्षम करणे, अंगणवाडी सेविकांना किमान मानधन साडेदहा हजार रुपये करणे जे शासनाच्या समितीनेच आपल्या अहवालात नमूद केले आहे, अशा वेगवेगळ्या मागण्यांवर चर्चा होणार असून शिवसेनेने यापूर्वीच अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.