दोन महिन्यांचे थकीत वेतन देण्याची मागणी

मुंबई : कोल्हापूर, सांगली भागातील अंगणवाडी सेविकांचे संसार पुरात वाहून गेले आहेत. आता तरी गेल्या दोन महिन्यांचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन सरकारने द्यावे, अशी मागणी करत मुंबई आणि ठाणे विभागातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आझाद मैदान येथे आंदोलन केले.

अंगणवाडी सेविकांचे काम पाहून सप्टेंबर २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले वाढीव मानधन वर्ष उलटत आले तरी अद्याप अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू केलेले नाही. सेविकांचे वेतन १८ हजारांपर्यंत वाढविण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे. त्यांचे नियमित वेतनही गेल्या दोन महिन्यांपासून झालेले नाही, अशा परिस्थितीमध्येही पावसाळ्यात अंगणवाडी सेविका राज्यभरात कार्यरत आहेत. त्यामुळे या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीअंतर्गत राज्यभरात ठिकठिकाणी ७ ऑगस्टपासून जेलभरो आंदोलन सेविकांनी सुरू केले आहे. याचाच एक टप्पा म्हणून मंगळवारी मुंबई आणि ठाणे विभागातील जवळपास ६०० महिला आझाद मैदानावर जमा झाल्या होत्या. संघटनेच्या शिष्टमंडळाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार भेटीसाठी वेळ देत नसल्याने महिलांनी मैदानातील बॅरिकेड ओलांडून रस्त्याकडे कूच केली. महिलांचा मोर्चा मैदानाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित यंत्रणांनी याबाबत मंत्र्यांना कळविले. त्यावर तातडीने मुनगंटीवार यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली.

पुन्हा आश्वासनेच : अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत अर्थमंत्र्यांनी पुन्हा एकदा केवळ आश्वासने दिली आहेत. गेल्या १५ दिवसांपासून जवळपास ४० हजार अंगणवाडी सेविकांनी जेलभरो आंदोलने केली आहेत. वेतनवाढ नाहीच, परंतु कोल्हापूर, सांगली भागातील अंगणवाडी सेविकांचा विचारही  करायला सरकार तयार नाही. या महिलाचे संसार पुरामध्ये वाहून गेले आहेत. त्यांना आता तरी गेल्या दोन महिन्यांचे थकीत वेतन सरकारने द्यावे. अंगणवाडी सेविका कायदा हातात घेऊन कोणतेही पाऊल उचलत नाहीत, याचा सरकार गैरफायदा घेत असल्याचे संघटनेच्या निमंत्रक शुभा शमीम यांनी सांगितले.