शैलजा तिवले

करोना लसीकरणासाठी प्राधान्य दिलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या यादीत  गरोदर माता आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मात्र वगळले आहे. त्यांनाही प्राधान्य देण्याचे आश्वासन राज्याच्या आरोग्य विभागाने दिले असले तरी पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये अंगणवाडी सेविकांचा मात्र समावेश केलेला नाही.

लस उपलब्ध झाल्यानंतर प्राधान्याने आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य विभागाने घेतला असून त्यानुसार या कर्मचाऱ्यांच्या नोंदी करण्याची सूचना राज्यांना दिली आहे. केंद्राच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाने राज्य स्तरावर लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माहितीचे संकलन करण्यास सुरूवात केली आहे. यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक नियमावलीही जाहीर केली आहे. यानुसार, आरोग्य सेवा देणारे आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणारे खासगी आणि सरकारी व्यवस्थेतील कर्मचारी म्हणजे आरोग्य कर्मचारी अशी व्याख्या नमूद केली आहे. पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचारी, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, निमवैद्यकीय कर्मचारी, वैज्ञानिक आणि संशोधन कर्मचारी, विद्यार्थी, रुग्णालयातील इतर कर्मचारीअशी वर्गवारी दिली आहे.

पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये आशा सेविका, आशा गटप्रवर्तक, परिचारिका(एएनएम), बहुउद्देशीय कर्मचारी यांचा उल्लेख केला आहे. परंतु या यादीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा समावेश केलेला नाही.

अंगणवाडी सेविकांसह बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचाही लसीकरणाच्या प्राधान्य यादीत समाविष्ट करण्यात येईल, असे आरोग्य विभागाचे प्रमुख सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. परंतु प्रत्यक्षात याबाबतचे आदेश मात्र संबंधित यंत्रणांना दिलेले नाहीत. अंगणवाडी ही आरोग्य विभागाच्या अखत्यारित येत नाही. आम्हाला तरी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोंदीमध्ये अंगणवाडी सेविकांची नावे घेण्याबाबतच्या सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही यांची नोंदणी केलेली नाही, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईतून खासगी आणि सरकारी अशा एकत्रित एक लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी पालिकेने केली आहे.

राज्यात २ लाख ७ हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. करोना काळात अंगणवाडय़ा बंद असल्या तरी गरोदर, स्तनदा माता आणि बालकांना रेशन पुरविणे, त्यांच्या वजनाच्या नोंदी करणे, लसीकरण झाले आहे का याची पाहणी करणे इत्यादी कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सुरूच आहेत.  काही अंगणवाडी सेविका आणि मदतनीसनांही करोनाची बाधा झाली,  आशा सेविकांप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्राधान्यक्रम देत लसीकरणात समाविष्ट करावे अशी मागणी राज्य सरकारकडे करत आहोत, असे महाराष्ट्र अंगणवाडी कृती समितीच्या निमंत्रक शुभा शमीम यांनी सांगितले.