‘आंग्रीया’ क्रूझला हिरवा झेंडा

‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ने भाऊचा धक्का परिसरात नव्याने बांधलेल्या आंतरदेशीय क्रूझ टर्मिनलचा उद्घाटन सोहळा शनिवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि बंदर विकासमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. या वेळी मुंबई ते गोवा जलमार्गावर सागरी पर्यटनाचा आनंद देणाऱ्या देशातील पहिल्या आंतरदेशीय ‘आंग्रीया’ क्रूझला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

राज्यातील बंदर आणि रस्ते विकासासाठी ७ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे नितीन गडकरी यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले. त्यापैकी ५ लाख कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली असून उर्वरित निधी रस्ते विकासासाठी देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

आंतरदेशीय क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या वतीने भाऊचा धक्का परिसरात आंतरदेशीय क्रूझ टर्मिनल उभारण्यात आले आहे. या टर्मिनलमधून पर्यटकांना आंतरदेशीय क्रूझ पर्यटनाचा सुखकर प्रवास घडविण्याचा पहिला मान ‘आंग्रीया’ क्रूझला मिळाला आहे. मुंबई-गोवा सागरी मार्गावर ही क्रूझ २४ ऑक्टोबरपासून अधिकृतपणे पर्यटकांना घेऊन प्रवास करणार आहे. या नव्या आंतरदेशीय क्रूझ टर्मिनलच्या उद्घाटनाबरोबरच आंग्रीया क्रू झच्या प्रवासाला शनिवारी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या वेळी कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि इतर नेते मंडळी उपस्थित होती.

या वेळी सागरमालाअंतर्गत राज्यात ११५ प्रकल्प राबविण्यात येत असून बंदरांच्या विकासासाठी २.३५ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे केंद्रीय नेते नितीन गडकरी यांनी सांगितले. रस्ते विकासासाठी ४.५ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामधील ३.४ लाख कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात झाल्याची माहिती त्यांनी दिली. तर आंतरदेशीय क्रूझ टर्मिनलच्या ठिकाणी ३ एमएलडी क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.

असे आहे क्रूझ!

आंग्रीया क्रूझवर १०४ खोल्या असून सुमारे ४०० पर्यटकांच्या लवाजम्यासह या क्रूझचा प्रवास होणार आहे. यासाठी सहा ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान प्रवास तिकीट आकारण्यात येणार आहे. चार ते चौदा व्यक्तींच्या कुटुंबासह जोडप्यांसाठी खास खोल्यांची सुविधा क्रूझमध्ये करण्यात आली आहे. या खोल्या सर्व सुखसोयींनी सज्ज आहेत. खोल्यांच्या निवडीनुसार प्रवास खर्च आकारला जाईल. शिवाय डेक बार, रेस्ट्रो बार, डिस्को बार, जलतरण तलाव, स्पा, वाचनालय कक्ष अशा सुविधा क्रूझवर आहेत.