उपनगरीय रेल्वे लोकल सेवा सुरू करा, या मागणीसाठी विरार रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी प्रवाशांनी उत्स्फुर्तपणे आंदोलन केले. सकाळी ११ वाजता हजारो प्रवासी यावेळी घोषणा देत रेल्वे रुळावर आणि परिसरात उतरले होते.

उपनगरीय रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. त्यामुळे खासगी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी बसेसमधून मुंबईला जावे लागते. मात्र या बसेसची संख्या कमी असून कार्यालयात पोहोचण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे प्रवाशामंध्ये असंतोष होता. त्याचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचे पाहायाला मिळाले. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हजारो प्रवासी विरार रेल्वे स्थानक परिसरात जमा झाले आणि रुळांवर उतरले. उपनगरीय रेल्वे सुरू करा… अशी मागणी करत त्यांनी घोषणा दिल्या. काही वेळाने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यापुर्वी २२ जुलै रोजी देखील नालासोपार रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी आंदोलन केले होते.

एसटी बसेसची संख्या कमी असते. त्यांना महामार्गाला वळसा घालून मुंबईत जावे लागते. वाहतूक कोंडी आणि लांबंचे अतंर यामुळे कार्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही, परिणामी पगार कापला जातो, असे आंदोलनकर्त्या महिलांनी यावेळी सांगितले. बसेसमध्ये गर्दी असल्याने करोना संसंर्गाचाही धोका असतो, असेही आंदोलक प्रवाशांनी सांगितले.