News Flash

नवउद्योगासाठी भारतात परतणार

‘आयआयटी’मधील राष्ट्रपती पदक विजेता अनिकेत पाटणकरचा मानस

प्रा. मिलिंद अत्रे यांच्यासोबत अनिकेत पाटणकर.

आयआयटीमधील राष्ट्रपती पदक विजेता अनिकेत पाटणकरचा मानस

‘आयआयटी’ मुंबईत मॅकेनिकल अभियांत्रिकी शाखेत पदवी मिळवल्यानंतर पुढील शिक्षणासाठी परदेशात जात असलो तरी दहा वर्षांनी पुन्हा भारतात येऊन समाजक्षेत्रातील नवउद्योग सुरू करण्याचा मानस आहे. देशात रुजत असलेल्या नवउद्यमी वातावरणाचे हे उदाहरण असून ‘आयआयटी’ मुंबईतील तमाम हुशार विद्यार्थ्यांना मागे टाकत या वर्षीच्या राष्ट्रपती पदकावर नाव कोरणारा मुंबईकर अनिकेत पाटणकरने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

मुंबईत विक्रोळीत वाढलेल्या अनिकेतने ‘आयआयटी’ मुंबईतून अभियांत्रिकी शाखेत पदवी मिळवली. संस्थेत सलग चार वष्रे सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या एका विद्यार्थ्यांला राष्ट्रपती पदकाने गौरविले जाते. शनिवारी पार पडलेल्या संस्थेच्या ५५व्या दीक्षान्त समारंभात अनिकेतला हे पदक प्रदान करण्यात आले.   अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना संशोधनाची आवड असल्यामुळे अनिकेतने संस्थेतील ‘मॅकेनिकल’ अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक मिलिंद अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनास सुरुवात केली. देशाच्या अंतराळ प्रवासाला याचबरोबर संरक्षण क्षेत्रातील विविध प्रयोगांसाठी आवश्यक असलेल्या ‘क्रायोजेनिक इंजिन’च्या कुलिंग प्रक्रियेवर त्याचे संशोधन होते. सध्या वापरण्यात असलेली प्रक्रिया ही फार खर्चीक असून त्यासाठी आवश्यक ते कॉम्प्रेसर भारतात तयार होत नाही. यामुळे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अनिकेतने संशोधन सुरू केले. त्याच्या संशोधनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्याचा प्रबंधही प्रकाशित झाला आहे.

येथील पदवी मिळाल्यानंतर त्याने ‘एमआयटी’मध्ये ‘एमएस’चे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला आहे. तेथेच ‘पीएचडी’ करण्याचा मानस असल्याचे अनिकेतने सांगितले. ‘एमआयटी’मध्ये माझ्या संशोधनाशी संबंधित इतर अन्य विषय घेऊन ‘पीएचडी’ करण्याचाही माझा विचार आहे. ही सर्व प्रक्रिया सहा वर्षांची आहे. त्यानंतर तीन वष्रे एका चांगल्या कंपनीत नोकरी करून शिक्षण व अनुभव घेऊन दहा वर्षांनी पुन्हा भारतात परतण्याचा मानस असल्याचे अनिकेतने सांगितले.

आज आपल्या देशात आरोग्य क्षेत्रात भरीव कामाची आवश्यकता आहे. यासाठी नवउद्योगांनी यावर काम करणे अपेक्षित आहे. मीही या क्षेत्रात काम करू इच्छित असून भारतात परत येऊन माझ्या संशोधनाशी संबंधित समाजोपयोगी नवउद्योग सुरू करण्याचा माझा मानस असल्याचे अनिकेतने सांगितले. अनिकेतने मॅकेनिकल अभियांत्रिकीबरोबरच संगणक विज्ञान शाखेतही जोड पदवी घेतली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 1:14 am

Web Title: aniket patankar want to open business in india
Next Stories
1 ‘मसाप’च्या संकेतस्थळावर साहित्यिकांच्या जन्म-मृत्यू तारखांचा घोळ!
2 ‘वंदे मातरम्’वरुन राजकारण करण्यापेक्षा त्यासाठी कायदा करा- उद्धव ठाकरे
3 मुंबई: मालगाडीवर सेल्फी घेताना मुलाचा मृत्यू
Just Now!
X