अ‍ॅनिमल एन्जल्स फाउंडेशनचे मोलाचे काम; गतिमंदांसह कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांनाही लाभ

इतर प्राणी आणि मनुष्य प्राणी यांच्यातील मत्री आणि सख्य आदिम काळापासून चालत आले आहे. कोणताही पूर्वग्रह न ठेवता प्राणी माणसांवर प्रेम करतात. नेमकी हीच गोष्ट हेरून अ‍ॅनिमल असिस्टेड थेरपी या वेगळ्याच उपचारपद्धतीचा वापर करणाऱ्या अ‍ॅनिमल एन्जल्स फाउंडेशनने आज अनेक मुलांच्या आयुष्यात मोठा आनंदाचा बदल घडवून आणला आहे. जन्मजात गतिमंद किंवा विशेष मुलांबरोबरच कॉर्पोरेट क्षेत्रातल्या किंवा अगदी सर्वसामान्य लोकांना ताण, नराश्य यातून बाहेर काढण्यासाठी या उपचारपद्धतीचा वापर होतो. दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेने आतापर्यंत अनेक उपक्रमांद्वारे हे वारंवार सिद्ध केले आहे.

देशातील पहिल्या अ‍ॅनिमल असिस्टेड थेरपिस्ट असलेल्या मीनल कविश्वर यांनी या कामाची सुरुवात २००३मध्ये केली. त्यानंतर २००६मध्ये त्यांनी पुण्यात संस्थेची नोंदणी करत या कामाला नियमांची एक चौकटही दिली. तेव्हापासून आतापर्यंत या संस्थेने अनेक शाळा, कॉर्पोरेट उद्योगसमूह, आंतरराष्ट्रीय विमानतळ, नसíगक आपत्तीत हानी झालेले प्रदेश अशा अनेक ठिकाणी आपल्या प्रशिक्षित श्वानांसह विविध उपक्रम राबवले आहेत. मुंबईत २० आणि पुण्यात २० असे ४० प्रशिक्षित श्वान या संस्थेच्या उपक्रमांत आहेत. त्याशिवाय त्यांच्याबरोबर प्रशिक्षित अ‍ॅनिमल थेरपिस्ट आणि डॉग हँडलर्सही काम करत आहेत.

पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा, मांजर या प्राण्यांचे स्थान अगदी उच्च असते. मात्र त्यांच्याकडून छोटीमोठी कामे करून घेण्याऐवजी किंवा त्यांचे लाड करण्याऐवजी त्या प्राण्यांच्या मनुष्याप्रति असलेल्या निरपेक्ष प्रेमातून काही भरीव कामगिरी करता येईल का, या विचारातून या संस्थेची सुरुवात झाली. पुणे आणि मुंबई येथे काम करणाऱ्या या संस्थेतर्फे सर्वप्रथम ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळा या विशेष मुलांसाठीच्या शाळेत हा उपक्रम पहिल्यांदा राबवण्यात आला. विशेष मुलांकडे पाहण्याचा सर्वसामान्य माणसांचा दृष्टिकोन कधीच निकोप नसतो. पण प्राणी त्यांच्याकडे अगदीच निरलस भावनेने जातात. त्यामुळे अशी मुले आणि कुत्रे यांच्यात नसíगकरीत्याच एक छान नाते असते. या नात्याचाच आधार घेऊन त्या मुलांवर उपचार करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांची भीड चेपावी म्हणून प्रशिक्षित श्वानांचा वापर केला गेला, असे संस्थेच्या मुंबई विभागाचे प्रमुख आणि संचालक आकाश लोणकर यांनी सांगितले. या उपक्रमाला यश आल्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक यशस्वी उपक्रम राबवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या या संस्थेतर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक उपक्रम सुरू आहे. त्याशिवाय अनेक कंपन्या व शाळांतही संस्थेचे उपक्रम सुरू आहेत.