मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागातर्फे उद्यापासून (गुरुवार) सुरू होणाऱ्या पक्षी, मासे आणि प्राण्यांच्या प्रदर्शनावर ‘प्राणीप्रेमी’ मनेका गांधी यांनी आक्षेप घेतल्याने हे प्रदर्शनच गुंडाळावे लागते की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, प्रदर्शनात प्राणी किंवा पक्षी यांची विक्री होणार नसून केवळ पाहण्यासाठी असल्याची भूमिका मुंबई विद्यापीठाने घेतल्याने प्रदर्शनाच्या आयोजनावर येऊ घातलेली बंदी टळली आहे. तसेच, या प्रदर्शनाकरिता असलेले शुल्कही रद्द करण्यात आल्याने प्राणी व पक्षीप्रेमींना हे प्रदर्शन आता मोफत पाहता येईल.
कलिना संकुलातील स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये सकाळी १० वाजता कुलगुरू राजन वेळुकर यांच्या उपस्थित या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. ६ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७.३० पर्यंत हे प्रदर्शन खुले राहील. संजीवन ट्रस्टचे साहाय्य या प्रदर्शनाला लाभले आहे.
प्राणी, पक्ष्यांचे असे उघड प्रदर्शन म्हणजे मुक्या प्राण्यांवर अन्याय आहे, असा आक्षेप घेत मनेका गांधी यांनी या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी कुलगुरूंकडे केली होती. या प्रदर्शनासाठी ‘अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’ची परवानगी घेतली की नाही, असा सवाल त्यांनी कुलगुरूंशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात केला. परंतु, ‘या प्रदर्शनात केवळ प्राणी व पक्ष्यांचे केवळ प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. त्यांच्या खेळांचे सादरीकरण केले जाणार नसल्याने मंडळाच्या परवानगीचा प्रश्नच येत नाही,’ असे ब:हिशाल विभागाचे म्हणणे आहे. या आधीही या प्रकारचे प्रदर्शन विद्यापीठात भरविण्यात आले होते. त्यावेळी २० हजार लोकांनी त्याला भेट दिली होती.
ताज्या पाण्यातील मासे, समुद्रातले मासे, पाळीव पक्षी, साप, कुत्रे, मांजरी यांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे. माशांचे ४० ते ४५ टँक्स, पाळीव प्राण्यांचे ४०-४५ पिंजरे प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. मासे कसे पाळावेत, काय काळजी घ्यावी, पाळीव प्राण्यांची कशी काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांकडून व्याख्याने दिली जाणार आहेत.