29 September 2020

News Flash

महालक्ष्मी येथे लवकरच पालिकेचे पशुवैद्यकीय रुग्णालय

सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून जनावरांवर सवलतीत उपचार

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई महानगरपालिकेतर्फे लवकरच महालक्ष्मी येथे सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयासाठी ट्रस्टला महालक्ष्मी येथे ४,३४०.१९ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड उपलब्ध करण्यात येणार आहे. सर दोराबजी टाटा ट्रस्टला देण्यात येणाऱ्या या भूखंडाच्या प्रस्तावावर सुधार समितीने शनिवारी मंजुरीची मोहर उमटविली. पालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा होईल.

मुंबईमध्ये गाय, बैल, म्हशी, शेळ्या-मेंढय़ा, श्वान, कोंबडय़ा आदी एक लाख १५ हजार ४४८ पाळीव प्राणी असल्याचे पशुगणनेनुसार उघडकीस आले आहे. यामध्ये ९५ हजार १७४ भटकी, तर ३५ हजार ५७२ पाळीव कुत्र्यांचा समावेश आहे. तथापि, कुत्र्यांचा प्रजनन दर लक्षात घेता आजघडीला मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या एक लाख, तर पाळीव कुत्र्यांची संख्या ८० हजाराच्या आसपास पोहोचली आहे. मुंबईतील पाळीव आणि भटक्या जनावरांना उपचार मिळावेत या उद्देशाने मुंबईमध्ये पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्याचबरोबर प्राण्यांमुळे मानवाला होणाऱ्या आजारावर नियंत्रण मिळविता यावा हाही पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या उभारणीमागील एक उद्देश आहे.

मुंबईतील २०० खासगी पशुवैद्यकीय दवाखाने आणि परळ येथील ‘मुंबई सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टी टू अ‍ॅनिमल’ संस्थेच्या खासगी रुग्णालयात प्राण्यांवर उपचार केले जातात. तसेच खार येथे पालिकेचा एकमेव पशुवैद्यकीय दवाखाना आहे. खासगी दवाखान्यांमध्ये प्राण्यांवर उपचार करणे त्यांच्या सर्वसामान्य मालकांना आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. त्यामुळे महालक्ष्मी येथील आर्थर रोड कारागृहाच्या पाठीमागील ४,३४०.१९ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला. यासाठी पालिकेने अर्ज मागविले होते. सर दोराबजी टाटा ट्रस्टसह चार जणांनी पालिकेकडे अर्ज सादर केले होते. रुग्णालयाबाबत केलेल्या सादरीकरणात सर दोराबजी टाटा ट्रस्टला ७६.७५ गुण मिळाले आणि पालिकेने पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी या ट्रस्टची निवड केली. महालक्ष्मी येथील भूखंड ३० वर्षांसाठी ट्रस्टला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने शनिवारी सुधार समितीसमोर सादर केला होता. सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2019 1:41 am

Web Title: animal hospital of the municipality at mahalaxmi abn 97
Next Stories
1 नाताळ आणि नववर्षांनिमित्त पहाटे पाचपर्यंत मद्यविक्री
2 महाराष्ट्रातील जपानी भाषिक ‘गाईड’ अभ्यासदौऱ्यासाठी आज जपानला
3 महापालिकांमधील बहुसदस्यीय प्रभाग पद्धत बंद
Just Now!
X