गाई, म्हशी, बैल यांसारख्या मोठय़ा जनावरांसाठी चारा छावण्या उघडण्यात येतात, पाण्याची सोय करण्यात येते, परंतु शेळ्या-मेंढय़ांसारख्या लहान जनावरांना सरकारने वाऱ्यावरच सोडून दिले आहे. चारा व पाण्याच्या शोधात शेळ्या-मेंढय़ांचे कोकणाकडे स्थलांतर होत आहे. या लहान जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, असा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, परंतु त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे पशुसंवर्धन विभागातील सूत्राकडून सांगण्यात आले.
गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने पावसाळा संपल्यानंतर लगेचच पाणीटंचाईला तोंड देण्याची राज्यातील जनतेवर वेळ आली. मराठवाडय़ाला टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आणि मोठय़ा प्रमाणावर जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या. मराठवाडय़ात रब्बी पीक चांगले आल्याने व त्यामुळे चाऱ्याची पुरेशी उपलब्धता झाल्याने बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्य़ांतील जनावरांच्या छावण्या बंद करण्याचा अलीकडेच निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यावरून टीका होऊ लागल्याने या तीन जिल्ह्य़ांतील चारा छावण्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. चारा असला तरी, पाण्यासाठी जनावरांना छावण्यांमध्येच ठेवणे आवश्यक आहे, त्यामुळे आणखी काही महिने छावण्या सुरू ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

लहान जनावरांसाठी चारा छावण्यांचा प्रस्ताव
सातारा, सांगली व सोलापूरच्या दुष्काळी पट्टय़ात चारा व पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे मेंढपाळ मेंढय़ा घेऊन कोकणाकडे स्थलांतरित होत असल्याचे सांगण्यात आले. फेब्रुवारीपासून कोकणातही पाणीटंचाई सुरू होते. त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्या लहान जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. राज्यात सुमारे एक कोटी शेळ्या-मेंढय़ा आहेत. त्यात शेळ्यांची संख्या जास्त आहे. या लहान जनावरांसाठीही चारा छावण्या सुरू कराव्यात असा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, परंतु त्यावर निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.