20 September 2020

News Flash

क्रॉफर्ड मार्केटमध्ये प्राणी-पक्ष्यांची विक्री सुरूच

या बाजारात पक्षी-प्राण्यांची बेकायदा विक्री केली जाते.

गेल्या अनेक वर्षांपासून क्रॉफर्ड मार्केटमध्ये वसलेला विविध जातींच्या पक्षी आणि प्राण्यांचा बाजार बंद करण्याचे आदेश देऊनही तेथे पक्षी-प्राण्यांची बेकायदा विक्री सुरूच असल्याचे उघड झाले आहे. पालिका आणि पोलिसांच्या कारवाईवर अविश्वास दाखवत न्यायालयाने स्वत:च याची पाहणी करण्यास सांगितले होते. मात्र आदेशाची अंमलबजावणी केवळ दुकाने बंद ठेवण्यापुरती मर्यादित असल्याचे आणि पक्षी-प्राण्यांची बेकायदा विक्री सर्रास सुरू असल्याचे पाहणीतून उघड झाल्यामुळे न्यायालयाने हा आदेश  क्रॉफर्ड मार्केटपुरता मर्यादित न ठेवता मुंबईत सर्वत्र लागू करण्याचे आदेश पालिका आणि पोलिसांना दिले आहेत.

या बाजारात पक्षी-प्राण्यांची बेकायदा विक्री केली जाते. तसेच त्यापूर्वी त्यांना क्रूर वागणूक दिली जात असल्याची बाब याचिकेच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिल्यानंतर ही दुकाने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने पालिका आणि पोलिसांना गेल्या महिन्यात दिले होते. एवढेच नव्हे, तर ही दुकाने पुन्हा थाटण्यात आली तर पालिकेचे प्रभाग साहाय्यक आयुक्त आणि माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला होता. त्याच वेळी पोलीस आणि पालिकेकडून आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे की नाही याची महाराष्ट्र विधि सेवा प्राधिकरणाच्या उपायुक्तांनी या ठिकाणी अचानक भेट देऊन पाहणी करावी. तसेच त्याचा अहवाल छायाचित्रासह पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्याचेही न्यायालयाने सांगितले.

मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर गुरुवारी या प्रकरणी सुनावणी झाली असता महाराष्ट्र विधि सेवा प्राधिकरणाच्या उपायुक्तांनी या ठिकाणी अचानक भेट देऊन केलेल्या पाहणीचा अहवाल छायाचित्रासह न्यायालयात सादर केला. यानुसार, संबंधित अधिकाऱ्याने २७ एप्रिल रोजी दुपारी या बाजाराला भेट दिली. ग्राहक असल्याचे भासवून त्यांनी तेथे दोन कासव खरेदी करण्याचा प्रयत्न केला. बाजारातील सगळी दुकाने बंद होती; परंतु तरीही कासव आणून देण्याचे सांगत एका विक्रेता ते आणण्यासाठी निघून गेला. या सगळ्या प्रकाराची छायाचित्रेही सादर करण्यात आली. न्यायालयानेही अहवालाची दखल घेत पालिका आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकाराकडे दोन्ही यंत्रणा काणाडोळा करत असल्याचेच दिसून येत असल्याचेही न्यायालयाने म्हटले. त्याच वेळी न्यायालयाने  बंदीमुळे हा बाजार कुर्ला आणि बोरिवली येथे हलवण्यात आला असून तेथे पक्षी-प्राण्यांची बेकायदा विक्री केली जात असल्याचे याचिकाकर्त्यांने सांगितले. त्यामुळे बंदीचा आदेश केवळ क्रॉफर्ड मार्केटपुरता मर्यादित नसून मुंबईसाठी लागू आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच जेथे  बेकायदा विक्री होत असल्याची तक्रार आल्यास पालिका आणि पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 2:03 am

Web Title: animals and birds seller in crawford market
Next Stories
1 वज्रेश्वरीतील प्राणी निवारा संस्थेत प्राण्यांची हेळसांड
2 राम मंदिर स्थानकावर असुविधांचा सुकाळ
3 कांदळवनावरील अतिक्रमणावर कारवाई
Just Now!
X