दोन दशकांपूर्वी क्रिकेटवेडय़ा भारतात अन्य खेळांचा निभाव लागणे फारच कठीण होते. आताच्या इतके प्रायोजकदेखील अन्य खेळांकडे फारसे वळत नसत.

मात्र त्याच कालखंडात नेमबाजीमध्ये देदीप्यमान कारकीर्द घडवून देशाला अनेक पदके जिंकून देण्याची कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या सुवर्णकन्या अंजली भागवत यंदा लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमातील प्रमुख अतिथी असतील. येत्या शुक्रवारी, २४ जुलैला सायंकाळी ५ वाजता हा दूरचित्रसंवाद रंगणार आहे.

कारकीर्दीत विविध स्तरांवर पदके जिंकलेल्या अंजली यांना सुरुवातीला ज्युदो-कराटेची आवड होती. पण शालेय जीवनात राष्ट्रीय छात्रसेनेत (एनसीसी) असताना त्या नेमबाजीकडे आकर्षित झाल्या आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यांच्या नेमबाजीतील कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयातून. ‘एनसीसी’मध्ये दाखल झाल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी व्यावसायिक नेमबाजीत पाय रोवले. प्रथमच भाग घेत असूनही १९८८मध्ये राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक मिळवले.

पहिल्याच स्पर्धेतील घवघवीत यशानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. देशांतर्गत स्पर्धामध्ये त्यांनी जिंकलेली ५५ सुवर्ण, ३५ रौप्य आणि १६ कांस्यपदके हा आजही एक विक्रम आहे. १९९५मध्ये दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेतील सहभाग ही अंजली यांच्यासाठी पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धामध्ये ३१ सुवर्ण, २३ रौप्य आणि ७ कांस्यपदके असे घवघवीत यश त्यांनी मिळवले आहे.

नेमबाजीतून निवृत्त झाल्यावरही प्रशिक्षक म्हणून त्या अनेक नेमबाज घडवत आहेत. याशिवाय वृत्तपत्रांतील स्तंभलेखनापासून समालोचन आणि पुरस्कार निवड समितीतील सदस्य म्हणूनही त्या कार्यरत आहेत. त्यांच्यापासून स्फूर्ती घेत अनेक युवक-युवती नेमबाजीकडे वळले. देशाला ऑलिम्पिकमधील पहिले आणि एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक हे नेमबाजी या खेळातूनच मिळालेले आहे. त्या यशोगाथेची सुरुवात अंजली भागवत यांच्यापासूनच झाली हे निसंशय मान्य करावे लागेल.

विक्रम अबाधित..

आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले सुवर्णपदक अंजली यांनी १९९९मध्ये न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत मिळवले. २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी हुकली असली तरी २००२मध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात त्यांनी अग्रस्थान मिळवले. नेमबाजीच्या जागतिक स्पर्धामध्ये त्यांनी केलेले अनेक विक्रम आजही अबाधित आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या नावावर १३ विक्रम प्रस्थापित आहेत.

सहभागासाठी : https://tiny.cc/LS_SahajBolta Bolta _24July येथे नोंदणी आवश्यक.