सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चौकशीसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहे. या चौकशीची वेळ चुकीची असल्याचे मत दमानिया यांनी व्यक्त केले आहे. मात्र त्याचवेळी ही चौकशी याआधीच व्हायला हवी होती असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. तसचं राज ठाकरे यांच्या कमाईचे साधन काय?, त्यांच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? असा सवालही त्यांनी एका वृत्तवाहिनिशी बोलताना व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे यांची चौकशी २२ तारखेला म्हणजेच आज होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाल्यानंतर मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे सकाळपासूनच मुंबईमधील अनेक महत्वाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बंदोबस्तामध्ये राज ठाकरे त्यांची पत्नी शर्मिला आणि मुलगा अमित यांच्या सोबत पावणे अकराच्या सुमारास कृष्णकुंजवरुन ईडीच्या कार्यलयाच्या दिशेने रवाना झाले. सर्वच प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील वृत्त चालवण्यानंतर राज हे सहकुटुंब चौकशीला का जात आहे यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवर चर्चा सुरु झाली. दमानिया यांनाही ट्विट करुन यासंदर्भात प्रश्न उपस्थित करता राज यांनी सहकुटुंब चौकशीला जाणे हे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याची टिका केली आहे. एका वृत्तवाहिनिशी बोलताना त्यांनी “राज यांनी एवढा ड्रामा कशाला? चौकशीला जाताना कुटुंबाला घेऊन जाणं किती योग्य आहे? ईडीच्या कार्यालयात चौकशीला जाताना एकट्याने जावं, चौकशी झाल्यानंतर परत यावं,” असं मत व्यक्त केलं. राज यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे असं वाटतं का या प्रश्नालाही दमानिया यांनी उत्तर दिले. “राज ठाकरे सरकारविरुद्ध बोलत असल्याने त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचं बोललं जात आहे. तरी राज ठाकरेंकडे एवढी अमाप संपत्ती कुठून आली, प्रश्न विचारले तर काय चुकलं? खरं तर ही चौकशी खूप वर्षांपूर्वीच व्हायला हवी होती ती आज झाली. याबद्दल मी अभिनंदन करते,” असं दमानिया म्हणाल्या.

नक्की वाचा >> “राज ठाकरे ईडीच्या चौकशीला गेलेत की सत्यनारायणाच्या पूजेला?”

“भाजपाच्या घोटाळेबाज नेत्यांचीही चौकशी करा”

राज यांच्या चौकशीचे स्वागत करतानाच दमानिया यांनी भाजपाच्या घोटाळेबाज नेत्यांवरही कारवाई करावी अशी मागणीही केली आहे. “सरकारने केवळ त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच भाजपाच्या घोटाळेबाज नेत्यांवरही कारवाई करावी. प्रवीण दरेकर, मुकुल रॉय हे भाजपामध्ये गेले आणि त्यांच्याविरुद्धची घोटाळ्यांची चौकशी बंद झाली. भाजपाच्या या वॉशिंगमशीनमधून न निघणाऱ्यांची चौकशी होतेय. भाजपाविरुद्ध बोलणारे किंवा जे भाजपामध्ये जात नाहीत म्हणून त्यांच्याविरुद्ध चौकशी करणे चुकीचं आहे,” असं मत दमानिया यांनी व्यक्त केलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anjali damania questions about the property of raj thackeray on preview of ed inquiry scsg
First published on: 22-08-2019 at 12:50 IST