मुंबईमध्ये मागील आठवडाभरापासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या नेतृत्वाखाली खंबाटा एव्हिएशनच्या कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज वेगळे वळण लागले आहे. खंबाटा एव्हिएशन प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या कामगारांनी दमानियांच्या नेतृत्वाखाली ९ ऑक्टोबरपासून (गुरुवार) सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच इतर नेत्यांचा फोटो असलेले रावणाच्या अवतारातील पुतळ्याचे बॅनर लावण्यात आले. या बॅनरची लाज वाटत असेल तर स्वत: उद्धव ठाकरे यांनी बॅनर हटवायला हावे असे आव्हानच दमानिया यांनी या बॅनरचा फोटो ट्विट करत दिले आहे.

दमानिया यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी खंबाटा कामगारांना न्याय मिळून देण्याचे आश्वासन देणाऱ्या नेत्यांना आता बॅनर लागल्यावर का लाज वाटत आहे असा सवाल केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, “आता का लाज वाटते? कामगारांचे पैसे खातांना लाज नाही वाटली? कामगारांसाठी BKS union लढली नाही, नुसती आश्वासन? २७०० कुटुंबांना वाऱ्यावर सोडलं?, आज सकाळपासून पोलिस म्हणताहेत की आंदोलनाच्या ठिकाणाहून हा बॅनर हटवा. आम्ही हट्वणार नाही. उद्धव ठाकरेंना लाज वाटत असेल तर बॅनर हलवायला स्वतः यावं.” या फोटोत दिसत असणाऱ्या बॅनरमध्ये रावणाच्या तोंडाऐवजी वेळोवेळी आश्वासन देणाऱ्या नेत्यांचे चेहरे लावण्यात आले असून त्यावर ‘आई जगदंबा यांना सत्बुद्धी देवो…’ अशी ओळ लिहीण्यात आली आहे.

 

दोनच दिवसापूर्वी राज्याचे कौशल्य विकास आणि कामगार विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी बैठकीची तयारी दर्शवली होती. मात्र ही बैठक अयशस्वी ठरल्यास आंदोलन तीव्र करू असा इशारा देत कामगार प्रतिनिधी आणि दमानिया यांनी या बैठकीला उपस्थिती लावली. या संदर्भातील ट्विट स्वत: दमानिया यांनी केले होते.

मात्र रविवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये काही निर्णय न झाल्याने कामगारांचे आंदोलन सुरुच आहे. याच आंदोलनात आत आंदोलनकांनी उद्धव ठाकरे, निलेश राणे, किरीट सोमय्या यांच्यासहीत इतर शिवसेना नेत्यांचे चेहरे असणाऱ्या रावणाच्या अवतारातील प्रतिमेचा बॅनर लावल्याने नाव्या वादाला तोंड फुटले आहे.

काय आहे प्रकरण

मुंबई विमानतळावर ग्राऊंड हँडलिंग एजंट म्हणून काम करणारी खंबाटा एव्हिएशन कंपनी ऑगस्ट २०१६ मध्ये तडकाफडकी बंद करण्यात आली. त्यामुळे कंपनीतील २१०० कामगारांचा काही महिन्यांचा पगार, भविष्यनिर्वाह निधी व अन्य भत्ते अशी कोटय़वधी रुपयांची देणी थकलेली आहेत. अंजली दमानिया यांनी कामगारांची देणी मिळावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्यानंतर या प्रश्नाला गती मिळाली. या प्रश्नावरून महापालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना-भाजपमध्ये श्रेयाचे राजकारण चांगलेच रंगले होते. शिवसेनेने कंपनीशी तडजोड केली. शिवसेनेच्या काही शाखाप्रमुखांना या कंपनीतून पगार दिला जात असल्याचा आरोप निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री तसेच भाजपच्या अन्य नेत्यांनीही केला होता. वेळोवेळी आश्वासने देऊनही कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने दमानिया यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी मागील सहा दिवसापासून आंदोलन सुरु केले आहे.