मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक अग्रणी नेते, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची जबाबदारी झोपडपट्टटी पुनर्वसन प्राधिकरणावर सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शुक्रवारी तसा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

राज्यात या आधीपासूनच  महत्त्वाची तीन स्मारके उभारण्याचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलच्या जागेवरील आंतरराष्ट्रीय स्मारकाची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) सोपविण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकही एमएमएआरडीए  उभारणार आहे. अण्णा भाऊंचे स्मारक उभारण्याची जबाबदारी मात्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे देण्यात आले आहे.

घाटकोपर, चिरागनगर येथे अण्णाभाऊंचे वास्तव्य होते, ते घर स्मारक म्हणून या आधीच राज्य सरकारने घोषित केले आहे. अण्णाभाऊंचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  बैठकीत  त्यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार,  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व म्हाडा किंवा शिवशाही पुनर्वसन प्रकल्पांतर्गत करण्यात येणार असून, प्रकल्पाचे विकासक म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण राहील, असे सामाजिक न्याय विभागाच्या आदेशात म्हटले आहे.