कॅनडामध्ये राहणाऱया एका अनिवासी भारतीयाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अण्णा हजारे यांच्या सुरक्षेसाठी आता २६ पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. दरम्यान, अण्णा हजारे यांनी आपण अशा कोणत्याही धमकीला घाबरत नसल्याचे म्हटले आहे. केद्र सरकारच्या जमीन अधिग्रहण विधेयकाविरोधात आपण नियोजित पदयात्रा काढणारच, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
कॅनडातील अनिवासी भारतीयाकडून अण्णा हजारेंना जीवे मारण्याची धमकी
गगन विधू असे नाव असलेल्या या व्यक्तीने ‘अण्णा हजारे यांना मारण्याची वेळ आली आहे. आपण लवकरच नथूराम गोडसे बनणार आहोत’ अशी पोस्ट गेल्या महिन्यात २४ तारखेला प्रसिद्ध केली होती. याबद्दल माहिती मिळाल्यावर अण्णा हजारे यांच्या कार्यालयाने ठाणे पोलीसांकडे तक्रार दाखल केली असून, राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून याबद्दल माहिती देण्यात आली आहे.