News Flash

गर्दी रोखण्यासाठी राष्ट्रीय धोरण जाहीर करा!

उद्योगांसाठी करोनाविषयक कृती गट तयार केला असून मुख्यमंत्री सचिवालय त्याचे नियंत्रण करणार आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती

मुंबई : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करताना वाढणारी गर्दी हे एक आव्हान आहे. त्यामुळे धार्मिक, सामाजिक तसेच राजकीय कार्यक्रम, आंदोलने यामुळे विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता राष्ट्रीय पातळीवर याबाबत एक व्यापक धोरण आखण्यात यावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सज्ज असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

संभाव्य तिसरी लाट आणि महाराष्ट्रासह काही राज्यांतील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी सहा राज्यांतील मुख्यंत्र्यांशी दूचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा केली. त्यावेळी राज्यातील करोनाची स्थिती तसेच सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती ठाकरे यांनी मोदींना दिली. राज्यातील रुग्ण संख्या आणि मृत्यू दर कमी होत आहे, मात्र तो आणखी वेगाने कमी होण्याची गरज आहे. लसीकरण जोरात सुरू आहे, लसमात्रा वाया जाण्याचे प्रमाणही कमी केल्याची माहिती त्यांनी दिली. दुसऱ्या लाटेचे शेपूट देखील अद्याप वळवळत आहे, असे असताना रुग्ण संख्या घटत असली तरी पूर्णपणे कमी झालेली नाही. केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर सर्वच ठिकाणी लोक घराबाहेर पडत आहेत, गर्दी करत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून घरात कोंडून पडलेले अनेकजण आता खरेदी, पर्यटनासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. धार्मिक, राजकीय कारणांसाठी गर्दी होऊ लागली आहे. हे थांबविण्यासाठी राज्य प्रयत्न करीत आहेच, पण केंद्रीय पातळीवरूनही आपल्याला व्यापक धोरण आखावे लागेल, अशी विनंती ठाकरे यांनी पंतप्रधानांना के ली.

तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सज्ज असून कोणत्याही परिस्थिती यापुढील काळात करोनामुळे उत्पादनांवर आणि सेवांवर परिणाम होणार नाही आणि व्यवहार सुरूच राहतील याची दक्षता घेण्यात येत आहे. उद्योगांसाठी करोनाविषयक कृती गट तयार केला असून मुख्यमंत्री सचिवालय त्याचे नियंत्रण करणार आहे. कामगारांच्या काम आणि भोजनाच्या वेळांची विभागणी, सर्व कामगार-कर्मचारी यांचे लसीकरण, फिल्ड रुग्णालयांप्रमाणे कामगारांची तात्पुरती निवास व्यवस्था कंपनीच्या परिसरात करणे अशा सूचना उद्योगांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्याला जास्तीत जास्त लसमात्रा मिळाव्यात, महत्त्वाच्या औषधांच्या किंमती नियंत्रित कराव्यात तसेच करोना संसर्गानंतरच्या उपचारांसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची केंद्रे सुरू करण्यासाठी केंद्राने मदत करावी, अशी विनंती ठाकरे यांनी केली.

केंद्रीय प्रमाणानुसार, संभाव्य तिसऱ्या लाटेत राज्याला दररोज सुमारे ४ हजार मेट्रिक टन प्राणवायूची आवश्यकता भासेल. आम्ही २ हजार मेट्रिक टन उत्पादन करू शकतो. उर्वरित २ हजार मेट्रिक टन प्राणवायू नजीकच्या राज्यातून मिळाला तर मोठी मदत होईल. भिलाई, जामनगर, बेल्लारी पोलाद प्रकल्प या ठिकाणाहून प्राणवायू महाराष्ट्राला मिळावा, असे ठाकरे म्हणाले.

औषधांच्या किमतींवर नियंत्रण आवश्यक

मोनोक्लोनल एन्टीबॉडीज हे औषध सध्या उपचारांमध्ये प्रभावी आहे. मात्र त्याची किंमत ५० ते ६० हजार प्रती मात्रा असून तिसऱ्या लाटेत  ५० हजार रुग्णांना जरी हे औषध द्यायचे म्हटले तर ३०० कोटी रुपये लागतील, याचा विचार करून केंद्राने या औषधाची किंमत निश्चित करावी. तसेच ते सहज उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करावी, अशी विनंतीही ठाकरे यांनी पंतप्रधानांना के ली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 1:18 am

Web Title: announce a national policy to prevent congestion uddhav thackeray request to the prime minister akp 94
Next Stories
1 संभाव्य लाटेत उद्योग सुरू ठेवण्याचे नियोजन करावे- मुख्यमंत्री 
2 अनिल देशमुख यांची चार कोटींची संपत्ती जप्त
3 जेटच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेत कर्मचाऱ्यांचा असहकार
Just Now!
X