उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; सहाव्या सत्राकरिता प्रथमच पसंतीनुसार श्रेणी पद्धत

मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयीन प्रथम व द्वितीय वर्षांच्या तसेच विद्यापीठ स्तरावरील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांवर यंदा निवडणुकीचे सावट राहणार आहे. विद्यापीठाने आपल्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र त्यात आगामी लोकसभा निवडणुकांमुळे बदल होऊ शकतो, अशी सूचना विद्यार्थी व पालकांना केली आहे.

या वर्षी विद्यापीठ प्रथमच सहाव्या सत्राकरिता पसंतीनुसार श्रेणी पद्धत (चॉईस्ड बेस्ड क्रेडिट सिस्टीम) राबवीत आहे. यातील अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.

परीक्षांच्या तारखांना नुकत्याच झालेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विद्यापीठ उन्हाळी सत्राच्या ४८६ व महाविद्यालयाच्या ६४ अशा एकूण ५५० परीक्षा घेते, यापैकी अभियांत्रिकी वगळता इतर विषयांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या तारखा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उन्हाळी सत्राच्या परीक्षा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे परीक्षा वेळापत्रक, मूल्यांकन व निकाल यांचे नियोजन करण्यात आले आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

नवीन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार आता सर्व अभ्यासक्रमांची चार विद्या शाखेमध्ये विभागणी झाली आहे. यानुसार प्रमुख विद्या शाखा व उपविद्या शाखा यानुसार या परीक्षांचीही विभागणी झालेली आहे. या परीक्षा २५ मार्च ते १० जूनपर्यंत चालणार आहेत.

परीक्षा विभागातील परीक्षा व निकाल विभागाचे उपकुलसचिव कृष्णा पराड व त्यांच्या विभागाने या परीक्षांचे वेळापत्रक तयार केले असून ते करताना त्या त्या विद्या शाखांचे ९० दिवसांचे सत्र, सुट्टय़ा व इतर व्यावसायिक परीक्षा याचाही विचार करून या तारखांचे वेळापत्रक तयार केल्याचे उपकुलसचिव (जनसंपर्क) विनोद माळाळे यांनी सांगितले.

विद्यापीठ परीक्षा सुरू होण्याच्या तारखा

३ एप्रिल

बीकॉम (सत्र ६)

१२ एप्रिल

बीएस्सी (सत्र ६)

१५ एप्रिल

बीए (सत्र ६)

महाविद्यालयीन परीक्षांच्या तारखा

* बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी. (सत्र १ व ३) – २५ मार्च

* बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी. (सत्र ४) – १६ एप्रिल

* बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी. (सत्र २) – ३० एप्रिल

* बीएमएम (सत्र १ व ३) – २५ एप्रिल

* बीएमएम (सत्र २) – ४ एप्रिल

* बीएमएम (सत्र ४) – १८ एप्रिल

 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जाहीर होणाऱ्या तारखांमुळे काही परीक्षांच्या तारखांमध्ये बदल होऊ  शकतो. विद्यार्थी व पालकांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उन्हाळी सत्राच्या परीक्षा या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याने त्या वेळेवर सुरू करून त्यांचा निकाल वेळेवर जाहीर करण्यास विद्यापीठाचे प्राधान्य राहील.

– डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू