सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची घोषणा
नाटय़कलेला प्रोत्साहन देण्यासाठी येत्या काळात राज्यातील प्रत्येक शहरात राज्य सरकार नाटय़गृहे बांधणार असून सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेली नाटय़गृहे अधिक कार्यक्षमपणे चालवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केले. बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात पार पडलेल्या रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
या सोहळ्यात रजनी जोशी यांना कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते संगीताचार्य अण्णासाहेब किलरेस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, तर रामकृष्ण नायक यांना श्रीकांत मोघे यांच्या हस्ते नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अशा सोहळ्यांमध्ये राजकीय नेत्यांना भाषण करण्याची संधी न देता त्या त्या क्षेत्रांतील दिग्गजांच्या हस्तेच हे पुरस्कार कलावंतांना दिले गेले पाहिजेत.
तसेच राज्य सरकारतर्फे दादासाहेब फाळके चित्रनगरीचे नूतनीकरण करून कलाकारांना नाटय़ प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा स्थापन करणार असल्याची घोषणाही तावडे यांनी केली.
रामकृष्ण नायक यांनी आपल्या स्नेहमंदिर या संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, तसेच दुर्बल व दुर्लक्षित समाजातील मुलांच्या शिक्षण व आरोग्यासाठी चाललेल्या कार्याची माहिती दिली.
तसेच कार्यकर्त्यांनी आपले काम करत असताना यश, श्रेय आणि सत्कार यांच्यामागे न धावता श्रद्धा, निष्ठा, ध्यास व सातत्य यांचा अंगीकार करत आपले काम करत राहावे, असेही ते म्हणाले.
संगीत रंगभूमी हाच आपल्या जीवनातील श्वास आणि ध्यास असल्याचे सांगत रजनी जोशी यांनी जीवनभर निष्ठेने व अभ्यासपूर्ण कामाला मिळालेली ही पोचपावती असल्याची भावना व्यक्त केली.
तसेच या पुरस्कारामुळे संगीत रंगभूमीच्या प्रसारासाठी कार्य करण्याची उमेद निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.